सरकारच्या येत्या अर्थसंकल्पात आरोग्य सेवा क्षेत्राचा असणार मोठा वाटा
ग्रामपंचायती त्यांच्या स्तरावर लोकांना डिजिटल आरोग्य सुविधा देऊ शकतात. लहान शहरे आणि जिल्ह्यांतील तरुणांना प्रशिक्षण दिले जाऊ शकते. जेणेकरून ते गरजू लोकांपर्यंत डॉक्टरांचा सल्ला घेऊन जाऊ शकतील. यामुळे आता ग्रामीन भागातील तरूणांच्या हाताला देखील काम मिळण्याची शक्यता आहे. सरकारसमोर सध्या सर्वात मोठे आव्हान आहे, ते देशातील दुर्गम भागात वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देणे. या आव्हानावर मात करण्यासाठी सरकार आगामी अर्थसंकल्पात अनेक घोषणा करू शकते. यासाठी अर्थसंकल्पात डिजिटल आरोग्य पायाभूत सुविधांवर सर्वाधिक भर दिला जाण्याची शक्यता आहे.
अर्थसंकल्प २०२२ ची तयारी अंतिम टप्प्यात आहे. १ फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प २०२२ संसदेत सादर केला जाईल. फॉर्च्यूनच्या एका वृत्तात लिहिले आहे की, केंद्रीय अर्थ मंत्रालय डिजिटल आरोग्य पायाभूत सुविधांसाठी एक धोरण तयार करत आहे, ज्याबद्दल बजेटमध्ये घोषणा केली जाऊ शकते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार देशातील दुर्गम आणि ग्रामीण भागात वैद्यकीय पायाभूत सुविधा वाढवण्याचा सल्ला आरोग्य मंत्रालयाने दिला आहे. यामुळेच यासंबंधीच्या घोषणा अर्थसंकल्पात केल्या जाऊ शकतात. अहवालात म्हटले आहे की, आरोग्य मंत्रालयाने सल्ला दिला आहे की दुर्गम भागात आरोग्य सुविधा वाढवण्यासाठी ग्रामपंचायतींना अधिकार दिले जाऊ शकतात.