स्वाभिमानी संघटनेच्या आंदोलनाचा पुढील टप्पा; बुलढाण्यात टायर जाळून रास्ता रोको सुरु
शेतीला दिवसा दहा तास वीज आणि चुकीच्या वीजबिलांची दुरूस्ती करून द्या, या मागणीसाठी २२ फेब्रुवारीपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं कोल्हापूरच्या महिवितरणच्या कार्यालयासमोर आंदोलन सुरूच आहे. स्वाभिमानीचे प्रमुख माजी खासदार राजू शेट्टी हे गेल्या अकरा दिवसांपासून या धरणे आंदोलनात तळ ठोकून आहेत. याच आंदोलनाचा पुढचा टप्पा म्हणून आज राज्यभरातील ग्रामीण भागात रास्ता रोको करण्यात येत आहे. बुलडाण्यातील जळगाव जामोद येथे प्रशांत डिक्कर यांच्या नेतृत्वात शुक्रवारी पहाटेपासूनच स्त्यावर टायर जाळून रास्ता रोको आंदोलनाला सुरूवात झाली आहे.
शेट्टी यांनी आंदोलनाची हाक दिल्यानंतर राज्यभरात स्वाभिमानीचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. बुलडाण्यात रविकांत तुपकर हे शेकडो शेतकऱ्यांसह सकाळी रस्त्यावर उतरले असून त्यांनी नागपूर-सोलापूर महामार्ग चिखलीजवळ पेठ फाट्यावर अडवून धरला आहे. तर सांगलीच्या शिरोळमध्ये सांगली कोल्हापूर महामार्ग शेतकऱ्यांनी रोखून धरला आहे.
राज्यात वीजबिलांची थकबाकी न भरणाऱ्या ग्राहक आणि शेतकऱ्यांविरोधात महावितरणने कडक भूमिका घेतली आहे. वीजबिल न भरणाऱ्या शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचा वीज पुरवठा खंडीत करण्याचा धडाका महावितरणने लावला आहे. या कारवाईमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. रब्बीतील पिके ऐन भरात असताना शेती पंपाचा वीज पुरवठा तोडल्याने शेतकऱ्यांकडून रोष व्यक्त होत आहे. आम्ही वीजबिले भरायला तयार आहोत पण आम्हाला चुकीची बिले दुरुस्त करून द्या, अशी मागणीही शेतकरी करत आहेत. रात्री शेतीला पाणी देताना शेतकऱ्यांना जीव मुठीत धरून शेताला पाणी द्यावे लागते. त्यामुळे शेतीसाठी रात्रीऐवजी दिवसा वीज देण्याची मागणीही जोर धरत आहे.
दरम्यान, स्वाभिमानीच्या आंदोलना संदर्भात उर्जामंत्री नितीन राऊत यांनी शेट्टी यांच्याशी दोन दिवसांपूर्वी फोनवरून चर्चा केली. यावेळी राऊत यांनी शेट्टी यांना चर्चेसाठी बोलावल्याचे शेट्टी यांनी सांगितलं होते. संघटना चर्चेसाठी तयार आहे. मात्र, जोपर्यंत वीजेच्या प्रश्नावर तोडगा निघत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार, असं शेट्टी यांनी स्पष्ट केले आहे. याच दरम्यान आज राज्यभरात रास्ता रोको आंदोलन होत आहे. अद्याप तरी शेट्टी आणि राऊत यांची भेट झालेली नाही.