तीन दिवसाच्या घसरणीनंतर काय आहेत सोयाबीनचे दर ? नव्या तुरीचीही बाजारात आवक सुरु
नवी मुंबई : गेल्या तीन दिवसांपासून सोयाबानच्या (Soybean rate) दरात घसरण ही सुरु होती. अखेर आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोयाबीनचे दर हे स्थिर राहिल्याने शेतकऱ्यांना काही प्रमाणात का होईना दिलासा मिळाला आहे. तर दुसरीकडे खरिपातील  तुरीचेही आता बाजारपेठेत आवक सुरु झाली आहे. मात्र, हमीभावापेक्षा सध्या बाजारात कमी भाव असल्याने केवळ 100 कट्टेच तुरीची आवक ही झाली आहे. हा आठवडा (farmers) शेतकऱ्यांची धाकधूक वाढवणाराच होता. आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोयाबीनच्या दरात वाढ झाली पण त्यानंतर कायम चढउतार हे राहिलेले आहेत. तर गेल्या तीन दिवसांपासून सातत्याने घसरण सुरु झाली होती. त्याचा परिणाम आवकवर झाला आहे. आता सोयाबीनबरोबर तुरीचीही आवक वाढणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
आता सोयाबीन विक्रीवर शेतकऱ्यांचा भर
आतापर्यंत सोयाबीनच्या दर वाढले किंवा कमी झाले तरी शेतकरी हे साठवणूकीवरच भर देत होते. त्यांना दरवाढीची अपेक्षा होती पण गेल्या 10 दिवसांपासून सोयाबीनच्या दरात कायम चढ-उतार आला आहे. शिवाय आता 7 हजारापेक्षा अधिकचे दर हे सोयाबीनला मिळणार का नाही याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतकरी आता अधिकच्या दराची अपेक्षा न करता टप्प्याटप्प्याने विक्री करु लागले आहेत. शुक्रवारी लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 6 हजार 250 चा दर असतानाही सोयाबीनची आवक ही 14 हजार पोत्यांची झाली होती. त्यामुळे आता साठवणूकीपेक्षा विक्रीवर शेतकऱ्यांचा भर आहे.
नव्या तुरीचीही आवक सुरु
खरीप हंगामातील शेवटचे पिक हे तूर आहे. आता तूर अंतिम टप्प्यात असतानाच तूरीला मर रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे शेतकरी काढणीवर भर देऊन मिळालेले उत्पादन पदरी पाडून घेण्याचा प्रयत्न करीत आहे. तुरीची आवक सुरु झाली असून शुक्रवारी 100 कट्ट्यांची आवक झाली आहे. तर दर हा 6 हजार 200 रुपये क्विंटल मिळाला आहे. दुसरीकडे केंद्र सरकारने 6 हजार 300 रुपये हा हमीभाव घोषित केला आहे. मात्र, अद्यापपर्यंत हमीभाव केंद्रच सुरु केलेली नाहीत. त्यामुळे व्यापाऱ्यांची चांदी होत आहे. मात्र, पूर्ण हंगामा सुरु होण्यापूर्वी हमीभाव केंद्र सुरु करण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.
इतर शेतीमालाचे कसे आहेत दर
लातूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दुपारी 12 च्या दरम्यान शेतीमालाचे सौदे होतात. शनिवारी लाल तूर- 6400 रुपये क्विंटल, पांढरी तूर 5821 रुपये क्विंटल, पिंकू तूर 6300 रुपये क्विंटल, जानकी चना 4900 रुपये क्विंटल, विजय चणा 4900, चना मिल 4800, सोयाबीन 7252, चमकी मूग 7225, मिल मूग 6300 तर उडीदाचा दर 7601, पांढरी तूर 6300 एवढा राहिला होता.