राज्यात साखरेची १३२ लाख टन उत्पादन
चालू ऊस गाळप हंगामात महाराष्ट्राने विक्रमी १३२ लाख टन साखर उत्पादनाची नोंद केली आहे, असा दावा राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी केला आहे. मात्र, जादा उत्पादन होवूनही साखरेचे दर खाली येण्याची शक्यता कमीच असल्याचे गायकवाड यांनी म्हटले आहे. अतिरिक्त उत्पादनाशी संबंधित समस्या आणि परिस्थिती हाताळण्यासाठी पावले उचलली जात असल्याचेही ते म्हणाले. चालू हंगामात राज्यात एक हजार १८७ लाख टन उसाचे गाळप झाले असून बहुतांशी भागात अजूनही सुमारे ९० लाख टन उसाचे गाळपासाठी शिल्लक आहे. यामध्ये मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात ऊस गाळपाच्या प्रतिक्षेत आहे, असे गायकवाड यांनी सांगितले.
''महाराष्ट्राने याआधी २०१९-२० या हंगामात सर्वाधिक १०७ लाख टन साखर उत्पादनाची (Maharashtra Sugar Production) नोंद केली होती. यावर्षी ते जवळपास १३२ लाख टनांवर पोहोचले आहे, तर उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh Sugar Production) यावर्षी ८० लाख टन साखर उत्पादन झाले आहे,'' गायकवाड यांनी सांगितले. याशिवाय राज्यातील विविध कंपन्यांनी १३० ते १४० कोटी लिटर इथेनॉल उत्पादनातून (Ethanol Production) ९-१० हजार कोटी मिळविल्याचा दावाही गायकवाड यांनी केला आहे.