श्री कुलस्वामी पतसंस्थेवरील घोटाळा प्रकरणी स्थिगिती आदेश उठवून प्रशासक नेमण्याची मागणी
विद्यमान संचालकांना धक्का पुरावे नष्ट होऊ नये म्हणून संचालक मंडळ करा बरखास्त!
संबंधित प्रकरण मिटवण्यासाठी काही आर्थिक देवाण-घेवाण होत असल्याच्या चर्चा
गेली काही दिवसांपासून श्री कुलस्वामी पतसंस्था आर्थिक घोटाळा प्रकरणी बातम्या माध्यमातून येत आहेत. याबाबत नव्याने समोर आलेल्या माहितीनुसार मनसे सहकार सेनेच्यावतीने चौकशी आदेशाबाबत देण्यात आलेली स्थगिती उठवून प्रशासक नेमण्याची मागणी करण्यात आली आहे. याबाबत मनसे सहकार सेनेने सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांना लेखी निवेदन दिले आहे. तसेच सूत्रांनी दिलेल्या माहिती संबंधित प्रकरण मिटवण्यासाठी काही आर्थिक देवाण-घेवाण होत असल्याच्या चर्चा बाजार आवारात सुरु आहे. त्यामुळे मनसे सहकार सेना अधिक आक्रमक झाली असून संबंधित प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाल्यास याबाबतचा लढा आणखी तीव्र करण्यात येणार असल्याची माहिती सेनेच्या बाळासाहेब शिंदे यांनी दिली. तसेच करोडो रुपये वार्षिक उलाढाल असणाऱ्या या संस्थेत शाखा नूतनीकरण, नवीन शाखा सुरू करणे व त्यासाठी नवीन जागा खरेदी करणे तसेच आर्थिक कामकाजात भ्रष्टाचार उघड झाल्याचे निदर्शनास आले असल्याचे मनसे सहकार सेनेने आपल्या पत्रात म्हंटले आहे.
सहकार अपर निबंधक डॉ.पी. खंडागळे पुणे यांनी विशाल जाधवर उपनिबंधक ठाणे शहर यांना चौकशीचे आदेश दिलेले आहेत. परंतु कुलस्वामी पथसंस्थेने सदर चौकशी आदेशाबाबत बाळासाहेब पाटील यांच्याकडे अपील करून स्थगिती मिळणे करीता अर्ज केला होता. त्या अनुषंगाने सदर प्रकरणात १० मार्च पर्यंत तात्पुरती स्थगिती दिल्याचे निदर्शनास येते आहे. त्यामुळे हि स्थिगिती उठवून कारवाईची मागणी मनसे सहकार सेना करत आहे.
सभासदांचे व ठेवीदारांचे हित/ पैसा लक्षात घेवूनच /जोपासूनच पतसंस्था भागधारक व सभासद यांचा संस्थेवर असणारा विश्वास कायम राहावा व पतसंस्थेस कोणतीही हानी होऊ नये या हेतूने चौकशी कामी दिलेले स्थगिती आदेश तात्काळ उठवून पुढील चौकशी करण्याची मागणी मनसेने केली आहे. शिवाय याबाबत संबंधित अधिकारी वर्गास आदेश देण्याची मागणी केली आहे. तसेच चौकशी पूर्ण होईपर्यंत कोणताही दबाव तयार करून साक्षी पुरावे नष्ट होऊ नये म्हणून कुलस्वामी पथसंस्थेवर असणारे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नेमणूक करण्यात यावी अशी देखील मागणी त्यांनी केली.
यावेळी उपस्थित शिष्टमंडळात मनसे सहकार सेनेचे सरचिटणीस विजय जाधव, अनिल चितळे, अनिषा माजगावकर, संजय आडरकर, बाळासाहेब शिंदे, सुजाता पाठक, कौस्तुभ लिमये, वल्लभ चितळे, वैभव माळवे, विनायक जाधव, आशिष मोरे, संकेत निवडुंगे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.