कृषी पुरस्कारात नाराजी नाट्य; राजेंद्र पवार यांची पुरस्कार वितरण कार्यक्रमाकडे पाठ
राज्यातील कृषी विभागासाठी देण्यात येणार पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार कार्यक्रमाला राजेंद्र पवार यांनी उपस्थिती न दाखवल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. नाशिक येथे राज्यातील वसंतराव नाईक पुरस्काराचे वितरण राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे हस्ते पार पडत असताना बारामतीच्या ऍग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार यांनी पुरस्कार वितरणात राज्यपाल असल्याने कार्यक्रमाला उपस्थिती टाळल्याचे सांगण्यात येत आहे. तर पुरस्कार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते स्वीकारू असे मत त्यांनी मांडल्याचे समजते.
राष्ट्रीय नेते शरद पवार यांचे पुतणे आणि पद्मश्री आप्पासाहेब पवार यांचे सुपुत्र राजेंद्र पवार यांचे शेती विषयक कार्य संपूर्ण राज्याला ज्ञात आहे. त्यामुळे त्यांनी शेती क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल राज्य सरकारने त्यांची पुरस्कारासाठी निवड केली. पुरस्कार जाहीर झाल्यावर आनंद व्यक्त करणारे राजेंद्र पवार मात्र पुरस्कार वितरण सोहळ्याला उपस्थित राहिले नाही. ज्या कामासाठी आणि ज्यांच्या नावाने पुरस्कार दिला जात आहे, त्याचा विचार करता पुरस्कार एखाद्या कृषी कार्यालयात स्वीकारणे योग्य झाले असते असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
महाराष्ट्राचा इतिहास माहीत नसणाऱ्या आणि राज्यात अराजकता निर्मितीला खतपाणी घालणाऱ्यांच्या हस्ते जर पुरस्कार दिला जाणार असेल तर त्यांच्या हस्ते पुरस्कार कसा स्वीकारावा? असा सवाल त्यांनी केला आहे. शिवाय काही कारणांमुळे पुरस्कार स्वीकारायला गेलो नसल्याचे त्यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराजांनी शेती आणि शेतकऱ्यांसाठी प्रचंड मोठा आदर्श घालून दिला. अगदी राज्य करताना रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लागणार नाही याची काळजी घेण्याचे आदेश राज्यांनी आपल्या प्रशासनाला दिले त्यांचा आदर्श आपल्यासमोर आहे. शिवाय ज्यांच्या नावाने हा पुरस्कार दिला जातोय ते पंजाबराव देशमुख यांनी महाराष्ट्राच्या कृषी धोरणाची बिजे रोवून महाराष्ट्र शेतीच्या बाबतीत समृद्धीच्या मार्गाने नेल्याचे ते म्हणाले.