बनावट हापूस प्रकरणी गुन्हे दाखल; कृषी मंत्र्यांचे कडक कारवाईचे आदेश
बनावट हापूसच्या विक्रीत वाढ होत असून आंबा व्यवसायाची गणिते बदलू लागली आहेत. हापूस घेणारा विक्रेता देखील संभ्रमात आहेत. त्यात कर्नाटकचा हापूस आंबा हा कोकणचा हापूस म्हणून विकण्यात आल्याने यासंदर्भात 2 गुन्हे दाखल झाल्याची माहिती मंत्री दादा भुसे यांनी दिली आहे. याशिवाय बनावट हापूस विक्रेत्यांवर कडक कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. त्यामुळे बनावट हापूस विक्रेत्यांना चाप बसणार आहे.
मुंबई APMC मार्केटमध्ये ३ ते ४ गाडी परराज्यातून हापूस येत आहे. २५ ते ३० हजार पेटी बाजारात तर १५०० ते ४००० हजार रुपये पेटीला दर आहेत. तर अवकाळी पावसाने हापूस आंबा कमी प्रमाणात बाजारात येत आहे. शिवाय काही ग्राहक देखील दारोदार जाऊन कर्नाटक आंबा हापूस म्हणून विकत आहेत. मुंबई बाजार समितीत गेल्यावर्षी बनावट हापूस विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई देखील करण्यात आली होती. तर दर आंबा हंगामात बाजार समिती याबाबत पत्रक काढून व्यापाऱ्यांना सूचना देत आहे. तरी देखील ग्राहक फसवणूक सुरूच असल्याचे दिसत आहे.