शेतकऱ्यांची जवळपास १ कोटींची फसवणूक
पुणे जिल्ह्यातील वडगाव कांदळी, ता. जुन्नर येथील शेतकऱ्यांनी स्थापन केलेल्या फार्म रूट कंपनी एल. एल. सी. या शेतकरी कंपनीची १ कोटी ८ लाख ८१ हजार १२७ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दुबई येथील दहा व्यापाऱ्यांवर नारायणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. आशी माहिती फौजदार जी. आर. हिंगे यांनी दिली.
या प्रकरणी जबेल अल नज्जर फूड स्टफ ट्रेडिंग एल. एल. सी. व सदर कंपनीचा मालक व कामगार दुबई, दुर्गा प्रसाद कुणा (पूर्ण पत्ता माहित नाही), अब्दुल रहेमान अब्दुला इब्राहिम शराफ (रा. दुबई), आनंद देसाई (पूर्ण पत्ता माहित नाही), सना खान रा. मुबंई (पूर्ण पत्ता माहित नाही), फॅनॅस्को फूड स्टफ ट्रेडिंग एल. एल. सी. व त्याचे मालक दुबई, अब्दुल नासिर पडिकमनील, केरळ (पूर्ण पत्ता माहित नाही), अल्ताश हुसेन रा. ३४५ श्रीनगर, इंदोर, मध्यप्रदेश, सेगलावी फूड स्टफ अँड बेव्हरेज ट्रेडिंग एफ. झेड. या कंपनी व त्याचे मालक दुबई, मंगेश गांगुर्डे रा. नाशिक जि नाशिक महाराष्ट्र यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत फौजदार हिंगे म्हणाले, जुन्नर तालुक्यातील संतोष बापू भोर, सुहास शांताराम नेहरकर, देवेंद्र पानसरे, दीप्ती जाधव, भगवान काकडे, हरिश्चंद्र पवार, सुभाष जगताप, शांताराम नेहरकर, बापू भोर, इंदूबाई नेहरकर, सुधीर नेहरकर, ज्ञानेश्वर नेहरकर, सुरेखा ज्ञानेश्वर नेहरकर या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन वडगाव कांदळी (ता. जुन्नर) येथे फार्म रूट कंपनी एल. एल. सी. ही शेतकरी कंपनी स्थापन केली आहे. या कंपनी मार्फत उच्च दर्जाचा शेतमाल दुबई येथील कंपन्याना निर्यात केला जातो. शेतकरी कंपनीच्या वतीने २२ जानेवारी २०२१ ते ४ जून २०२१ या कालावधीत केळी, द्राक्ष, कांदे आदी शेतमाल दहा कंपन्याना निर्यात केला होता.
शेतमाल पोच झाल्यानंतर शेतमालाची तीस टक्के रक्कम व पंधरा दिवसांनी उर्वरित रक्कम देण्याचे ठरले होते. शेतमाल पोच झाल्यानंतर गुन्हा दाखल झालेल्या कंपन्यांनी शेतमालाची तीस टक्के रक्कम शेतकरी कंपनीला दिली. मात्र, उर्वरित १ कोटी ८ लाख ८१ हजार १२७ रुपयांची रक्कम वारंवार मागणी करूनही सदर कंपन्यांनी दिली नाही. त्यानंतर सदर कंपनीच्या चालकांनी मोबाईल नंबर बंद केला. दुबई येथे सदर कंपनीचा शेतकऱ्यांनी शोध घेतला कंपनीचे कार्यालय बंद असल्याचे आढळुन आले. याबाबत शेतकऱ्यांच्या वतीने संतोष बापू भोर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दहा कंपन्यांवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार हिंगे करत आहेत.