शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; दूध दरात वाढ
शेती उत्पादनात घट झाली असली तरी शेतीमालाचे वाढीव दर आणि आता शेतीचे जोड व्यवसाय शेतकऱ्यांना प्रतिकूल परस्थितीमध्ये साथ देत असल्याचे चित्र आहे. मध्यंतरीच सलग दोन वेळा गायीच्या दूध दरात वाढ झाली होती. याला महिनाही पूर्ण झाला नसाताना आता म्हशीच्या दूध दरात वाढ झाली आहे. गोकूळ आणि वारणा दूध संघाने हा निर्णय घेतला असून याच्या अंमलबजावणीला देखील सुरवात झाली आहे. त्यामुळे म्हशीचे दूध आता थेट 64 रुपये लिटरप्रमाणे मिळत आहे. वाढत्या उन्हामुळे म्हशीच्या दूध संकलनात झालेल्या घटीचा हा परिणाम असल्याचे सांगितले जात आहे. या दोन संघाने केलेल्या दर वाढीची अंमलबजावणी मुंबईसह उर्वरीत राज्यात देखील झाली आहे.
राज्याच्या राजधानीत 1 लाख 60 हजार दुधाचा खप
मुंबईत दिवसाकाठी 1 लाख 60 हजार वारणा दुधाचा खप होतो. यामध्ये 55 हजार लिटर दूध हे म्हशीचे तर उर्वरीत गायीचे असते. 31 मार्चपर्यंत म्हशीचे दूध 61 रुपये लिटर होते ते आता 1 एप्रिलपासून 64 रुपये लिटर झाले आहे. अनेक दिवसातून म्हशीच्या दूध दरात वाढ झाली आहे. तीन रुपयांनी झालेली वाढ ही शेतकऱ्यांना देखील दिलासा देणारी आहे. कारण आतापर्यंत केवळ पशूखाद्यांच्या दरातच वाढ होत होती.
वाढत्या उन्हामुळे दूध संकलनामध्ये घट
वाढत्या उन्हाचा परिणाम थेट दूध संकलनावरच होऊ लागला आहे. गोकुळचे रोजचे 60 ते 70 हजार लिटर दुधाचे संकलन हे घटले आहे. वाढत्या उन्हामुळे दरवर्षी अशी परस्थिती निर्माण होते. असे असले तरी मुंबईमध्ये दुधाची टंचाई ही भासणार नाही. कारण ज्याप्रमाणात दुधाचे संकलन हे घटले आहे तर दुसरीकडे सुट्ट्यांमुळे अनेक नागरिक हे गावाकडे परतत असतात. त्यामुळे मागणीतही घट होणार असल्याचे गोकूळचे व्यवस्थापक दयानंद माने यांचे म्हणणे आहे.
शेतकऱ्यांना फायदा काय?
दूध दरात 3 रुपयांची वाढ झाली असली तरी दोन महिन्यातून एकदा पशूखाद्याचे दर वाढत आहे. यंदा कापसापासून सरकी बनवण्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे टंचाई भासत असल्याने दरात वाढ झाली आहे. उत्पादनावरील खर्च हा वाढत आहे. शिवाय सध्या वाढत्या उन्हामुळे दूधही कमी झाले आहे. दुधाचे उत्पादन अधिक असते तर शेतकऱ्यांना जास्तीचा फायदा झाला असता असे डेअरी चालक गणेश शेटे यांनी सांगितले आहे.