शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: अतवृष्टी शेतकऱ्यांना राज्य सरकारची ७६३ कोटींची भरीव मदत
गेल्यावर्षी राज्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले होते. यामध्ये मराठवाडा विभागात शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला होता. यामुळे अनेक शेतकरी संकटात सापडले होते. यामुळे आता शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ठाकरे सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. या नुकसानीपोटी 763 कोटींची वाढीव मदत देऊन राज्य सरकारने बळीराजाला मोठा दिलासा दिला आहे. यामुळे आता हे पैसे शेतकऱ्यांना मिळणार आहेत. सरकारने उपलब्ध करून दिलेल्या निधीचे वाटप विभागीय आयुक्त सुनील केंद्रे यांच्यामार्फत विभागातील आठही जिल्ह्यांना वितरित करण्यास शासनाने मंजूरी दिली आहे.
यामध्ये संभाजीनगर जिल्ह्याला 9886.73 लाख, जालना - 9327.74 लाख, परभणी - 6781.05 लाख, हिंगोली - 5617.92 लाख, नांदेड - 13669.71 लाख, बीड - 14231.04 लाख, लातूर - 9749.67 लाख आणि धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 7111.31 लाखांचा निधी उपलब्ध होणार आहे. अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधी व राज्य शासनाच्या निधीमधून 1 हजार 35 कोटी 14 हजारांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यापैकी 763 कोटी 75 लाख 17 हजारांचा निधी मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी देण्यात आला आहे.
यामध्ये सर्वात जास्त 142 कोटींचा निधी बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिला आहे. दरम्यान, यंदाच्या पावसाळी हंगामात जोरदार पाऊस झाला. अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. हातातोंडाशी आलेले पीक शेतकऱ्यांच्या पदरातही पडले नाही. या आसमानी संकटाने अडचणीत सापडलेल्या लाखो शेतकऱ्यांना महाविकास आघाडी सरकारने तातडीची मदत देऊन मोठा दिलासा दिला आहे. यामुळे शेतकरी आता पुन्हा उभा राहू शकणार आहेत.
तसेच वाढीव दराने मदत करण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे. यामुळे आता पुढील पिकासाठी शेतकऱ्यांना हे पैसे वापरण्यात येणार आहेत. राज्यातील इतर जिल्ह्यात देखील अनेक शेतकरी अजूनही मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. यामुळे सध्या त्यांनी देखील मदत मिळण्याची मागणी केली आहे. सध्या संभाजीनगर जिल्ह्यासह मराठवाडा विभागात ऑगस्ट ते सप्टेंबरदरम्यान अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानीपोटी 763 कोटींची वाढीव मदत दिली गेली आहे.