HAPUS MANGO: हापूस आंबा आणि निर्यात काय आहेत गणिते; वाचा सविस्तर
आंबा म्हणजे फळांचा राजा. कोकणातला हापूस म्हणजे तर आंबाप्रेमींचा जीव की प्राण. त्यामुळे कधी एकदा आंबा बाजारात येतोय आणि आपण कधी एकदा त्याचा आस्वाद घेतोय, असंच अनेकांना होतं. यंदासुद्धा जानेवारीतच मुंबई APMC मध्ये आंबा दाखल झाला पण त्या वेळी आंब्याची आवक अतिशय कमी होती. शिवाय मोसमाची अगदी सुरुवातच असल्याने आंब्याचा भाव अक्षरश: गगनाला भिडलेला होता. आता मात्र किमती हळूहळू उतरू लागल्या आहेत. रोज आंब्याच्या जवळपास 30 हजार पेट्या येत आहेत. प्रत्येक पेटीमध्ये ५ डझन आंबे असतात. सध्या आंब्याची किंमत साधारण ७०० ते २ हजार रुपये डझन इतकी आहे.
सध्या चालू असलेल्या रशिया आणि युक्रेन युद्धामुळे निर्यातदार मात्र एकूणच निर्यातीविषयी अनिश्चितता व्यक्त करत आहेत. जगभरातल्या पुरवठा साखळीमध्ये व्यत्यय आलेला असताना कंटेनरच्या किंमती वाढल्या आहेत. त्यामुळे अनेक निर्यातदारांच्या मते, यंदा नेहमीपेक्षा थोडा कमी माल निर्यात होईल. परंतु या सगळ्यादरम्यान एक आनंदाची बातमी म्हणजे यूएस फोटोसॅनिटरी इन्स्पेक्टर यंदाची निर्यात प्रमाणपत्रं देण्यास उपलब्ध असतील. कोविडच्या महामारीमुळे यूएसला केली जाणारी आंब्याची निर्यात गेल्या दोन हंगामात थांबली होती. ती आता परत सुरू होईल. त्यामुळे यात शेतकऱ्यांसह निर्यातदाराला देखील यंदा फायदा होणार आहे.
सध्या मिडल इस्ट देशांमध्ये निर्यात सुरु आहे. यूरोपमध्ये देखील चालू असून लवकरच जपान आणि अमिरेकेला सुद्धा चालू होईल. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड व साऊथ कोरिया, कॅनडा, इंग्लंड येथे देखील हापूस आंब्याची मागणी वाढली आहे. तर निर्यात दर्जाच्या आंब्याला १५०० ते २००० डझन बाजारभाव मिळत आहे. रशिया-युक्रेन वॉरमुळे इंधनाचे दर वाढल्याने हवाई खर्च वाढला आहे. अपेक्षित निर्यात सुरु झाली नाही. इंधन दरवाढीचा निर्यातीवर परिणाम होईल. कारण तेथे आंबा महाग विकावा लागले. तरी निर्यात सुरु असून जेवढी आवक होत आहे. त्याच्या ३० टक्के  सध्या निर्यात होत असल्याचे व्यापारी संजय पानसरे यांनी सांगितले.