गृहमंत्री आणि सहकार मंत्र्यांच्या आदेशाला मुंबई APMC प्रशासनाकडून केराची टोपली!
गृहमंत्री आमच्या गावाचे सांगून काही व्यापाऱ्यांकडून प्रशासकीय अधिकाऱ्यांवर दबाव
तर कसा थांबणार अनधिकृत व्यापार
या अनधिकृत व्यापारामुळे बाजार समितीला कोट्यवधी रुपयांचे नुकसान
महिन्याभरापूर्वी म्हणजेच २५ जानेवारी रोजी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात तसेच इतर ठिकाणी सुरु असलेले घाऊक अनधिकृत व्यापार बंद करण्यासाठी बैठक घेण्यात आली होती. हि बैठक गृहमंत्री दिलीप वळसेपाटील, सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील व आमदार शशिकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली होती. यावर बाजार समिती प्रशासनासह संबंधित लोकांना कारवाईचे आदेश दिले होते. मात्र आज एक महिना पूर्ण होऊन सुद्धा या अनधिकृत व्यापारांवर कारवाई झालेली नाही. त्यामुळे बाजार समिती प्रशासनाने गृहमंत्री दिलीप वळसेपाटील आणि सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत झालेली बैठक केवळ दिखावा असल्याचे सिद्ध केले आहे.
मुंबई एपीएमसी भाजीपाला मार्केटमध्ये पॅसेज, धक्क्यावर आणि गाळ्यावर कांदा, बटाटा, लसूण, चिनी भाज्या तसेच पालेभाज्या यांचा मोठ्या प्रमाणात अनधिकृत व्यापार सुरु आहे. तसेच भाजीपाला मार्केट गेट नंबर ७ वरील अनधिकृत पान टपरी काढून त्या ठिकाणी गाड्या लावून कांदा-बटाटा व्यापार सुरु आहे.   तसेच ट्राफिक पोलीस चौकी ते माथाडी चौक, माथाडी भवन सिग्नलवर आणि इतर ठिकाणी अनधिकृत व्यापार बैठकी नंतर जोमात सुरु आहे. त्यामुळे हि बैठक केवळ मंत्र्यांचा वेळ फुकट घालवण्यासाठी घेल्याचे निष्पन्न होत आहे. तर बाजार समिती या ठिकाणी कारवाईसाठी गेली असता काही संचालक आणि त्यांचे सहकारी गृहमंत्री आमच्या गावचे असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांना मोठ्या रुबाबात सांगत असून बैठकीतील फोटो सुद्धा दाखवत आहेत. त्यामुळे बैठकीला हजर असलेले बाजार प्रतिनिधीच अनधिकृत व्यापार पाठीशी घालत असल्याचे दिसून येते. तर अधिकृत सूत्रांकडून आलेल्या माहिती नुसार हेच लोक कारवाईला अडथळा निर्माण करत आहेत असे सांगण्यात आले.
ज्या बाजारांना महानगरपालिका किंवा पणन संचालनालय, यांचेकडून अनुज्ञप्ति देण्यात आलेली नाही ते अनधिकृत घाऊक बाजार बंद करणे बाबत मुंबई कृषि उत्पन्न बाजार समितीने संबंधीत महानगरपालिका व पोलीस यंत्रणा यांना कळवून असे अनधिकृत बाजार बंद करण्याची कार्यवाही करावी. सदर बाबींचे महत्व लक्षात घेत या संदर्भात खालीलप्रमाणे दोन समित्यांचे गठण करण्यात येत आहे.
(अ) अंमलबजावणी समिती
१. सचिव, मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती, मुंबई         अध्यक्ष
२. विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था, मुंबई व कोकण   सदस्य
३. उप आयुक्त अतिक्रमण विभाग, म.न.पा मुंबई व नवी मुंबई   सदस्य
४. उप आयुक्त बाजार विभाग, म.न.पा मुंबई व नवी मुंबई   सदस्य
५. पोलीस आयुक्तालय, मुंबई व नवी मुंबई यांचे प्रतिनिधी सदस्य
६.व्यापारी असोसिएशन यांचे प्रतिनिधी सदस्य
(मुंबई कु.उ.बा.स. चे सल्याने)
७. हमार / माथाडी संघटना यांचे प्रतिनिधी
(मुंबई कु.उ.बा.स. चे सल्याने)
८. सहसचिव, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई.
ब) आढावा समिती
१. मा. मंत्री महोदय (सहकार व पणन)   अध्यक्ष
२.मा. श्री. शशिकांत शिंदे (वि.प.स) सदस्य
३. मा. प्रधान सचिव (पणन) सदस्य
४. मुंबई महानगरपालिका आयुक्त सदस्य
५. नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त सदस्य
६. कामगार आयुक्त महाराष्ट्र राज्य, मुंबई सदस्य
७. पोलीस आयुक्त, मुंबई व नवी मुंबई सदस्य
८. पणन संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे सदस्य
९. सभापती, मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती, पुणे   सदस्य
१०. सचिव, कृषि उत्पन्न बाजार समिती, मुंबई   सदस्य सचिव