सोयाबीन दरात वाढ; शेतकऱ्यांचा जीव भांड्यात
गेल्या दीड महिन्यापासून सोयाबीनचे दर स्थिरावले होते. त्यामुळे साठवलेल्या सोयाबीनची आता कमी दराने विक्री होणार की काय असे शेतकऱ्यांना वाटू लागले होते. यामुळे मिळेल त्या दरात सोयाबीन विक्रीचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला होता. मात्र, शेतकऱ्यांना त्यांच्या संयमाचे फळ मिळाले असल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. गेल्या काही दिवसांपासून ६ हजार रुपयांपर्यंत आलेले सोयाबीन आता ६ हजार ३०० झाले आहे. गेल्या दीड महिन्यातील हा उच्चांकी दर असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे शेतकरी राजा पुन्हा सुखावला आहे.
हंगामात अनेक वेळा सोयाबीनच्या दरात चढ-उतार झालेला आहे. शेतकऱ्यांनी घेतलेली भूमिकाही यासाठी जबाबदार ठरलेली आहे. सोयाबीनला चांगला दर असतानाच विक्री अन्यथा साठवणूक यामुळे सोयाबीनच्या दरात वाढ झाली होती. हंगामाच्या सुरवातीला सोयाबीन ४ हजार ५०० रुपये क्विंटल होते. मात्र, दिवाळीनंतर यामध्ये वाढ होऊन ६ हजार ५०० पर्यंत दर गेले. मात्र, गेल्या दीड महिन्यापासून ६ हजावरच सोयाबीन दर स्थिरावले होते. त्यामुळे आता दरात वाढ होते की नाही अशीच स्थिती निर्माण झाली होती. अखेर आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोयाबीन हे ६ हजार ३०० वर गेले असून आणखी दर वाढतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
खरिपातील सोयाबीन अंतिम टप्प्यात असतानाच दुसरीकडे उन्हाळी सोयाबीनही जोमात बहरू लागले आहे. उन्हाळी सोयाबीनला उतार अधिकचा नसल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात पेरा मोठ्या प्रमाणात झाला आहे. त्यामुळे आवकही वाढणार आहे. शेतकऱ्यांनी आता टप्प्याटप्प्याने का होईना सोयाबीनची विक्री करणे महत्वाचे अन्यथा आवक मोठ्या प्रमाणात सुरु झाल्यास अपेक्षित दर मिळणार नाही. त्यामुळे सध्याच्या वाढेलेल्या दराचा फायदा शेतकऱ्यांनी घेणे गरजेचे असल्याचे सांगण्यात येत आहे.