नवी मुंबई ते मुंबई वॉटर टॅक्सीचा शुभारंभ; तिकीट दर आणि आसन क्षमता, वाचा सविस्तर

मुंबई ते नवी मुंबई वॉटर टॅक्सी सुरु झाली असून आज त्याचा शुभारंभ करण्यात आला. मात्र या टॅक्सीचे दर सध्या तरी सामान्यांच्या आवाक्यात नाहीत. तर ५६ प्रवासी क्षमता असलेली एक कॅटामरान बोट आणि उरलेल्या ७ स्पीड बोटी अशा एकूण ८ वॉटर टॅक्सीला आता कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सुरुवातीच्या टप्प्यात तीन मार्गांवर वॉटर टॅक्सी धावणार आहे. नेरुळ-बेलापूर-जेएनपीटी-एलिफंटा-नेरुळ, डोमेस्टिक क्रूझ टर्मिनल-जेएनएनपीटी-एलिफटा-नेरूळ तर डोमेस्टिक क्रूझ टर्मिनल-बेलापूर-नेरूळ-डोमेस्टिक क्रूझ टर्मिनल दरम्यान टॅक्सी सेवा उपलब्ध असेल. टॅक्सी प्रत्येक थांब्यावर सुमारे १० मिनिटे थांबेल. मुंबईहून दर एक तासाला वॉटर टॅक्सी सेवा उपलब्ध असेल. प्रवाशांच्या संख्येनुसार सेवेत वाढ करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात ३२, ४० आणि ५० आसनी अशा तीन वॉटर टॅक्सी मुंबई-नवी मुंबई- एलिफंटा या मार्गावर चालवण्यात येणार आहे.
बेलापूर जेट्टीवरुन ही वॉटर टॅक्सी सुटेल. बेलापूरवरुन मुंबईला अवघ्या अर्ध्या तासात पोहोचणं या वॉटर टॅक्सीमुळे शक्य होणार आहे. तसंच वॉटर टॅक्सीमुळे वाहतूक कोंडीही सुटेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
प्रवाशांना जेटीपर्यंत सहज नेण्यासाठी बससेवेचीही व्यवस्था करण्यात आली आहे. मुंबईतील जेटीवर जाण्यासाठी सीएसएमटी स्थानकातून बसेस उपलब्ध करून देण्यात येतील. सीएसटी स्टेशन, गेटवे ऑफ इंडिया, नरिमन पॉइंट, चर्चगेट, वाशी स्टेशन, बेलापूर आणि जेनएनपीटीजवळ ब्रिज टॅक्सींची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रवासी वॉटर टॅक्सीची तिकिटे ऑनलाइन खरेदी करता येणार आहेत. टॅक्सी सुटण्याच्या किमान ३० मिनिटे आधी तिकीट काढावं लागणार आहे. ऑनलाइन व्यवहारांना चालना देण्यासाठी कंपनीने ३ हजार रुपयांपेक्षा जास्त रोख रक्कम न स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे.
वॉटर टॅक्सीने प्रवास करण्यासाठी एकेरी प्रवाशांना ७५० रुपये मोजावे लागणार आहेत. दुतर्फा भाडे १२०० रुपये असेल. १२ हजार रुपये खर्चून मासिक पासची सुविधाही प्रवाशांना मिळणार आहे. टॅक्सींसाठी ग्रूप बुकिंग करणाऱ्यांना सुमारे १५ टक्के सवलत दिली जाईल. ही किंमत सध्या तरी लोकलनं प्रवास करणाऱ्या लोकांसाठीही जास्त आहे. बेलापूर येथून भाऊच्या धक्क्यासोबतच एलिफंटा, जेएनपीटी या जलमार्गावरही या बोटी चालवल्या जाणार आहेत.