यंदा वातावरणाने आंबा आणखी धोक्यात; काय असेल आंबा हंगाम
कालपर्यंत वाढत्या उन्हामुळे आंबा पिकला धोका निर्माण झाला होता. तापमानामुळे आंबा होरपळून त्याची गळती सुरु होते. सबंध कोकणात असे चित्र असताना रात्रीतून वातावरणात असा काय बदल झाला आहे की शेतकरीही चक्रावून गेले आहेत. कालपर्यंत ऊन्हामुळे तर आता ढगाळ वातावरणामुळे होत्याचे नव्हते सुरु झाले आहे. निसर्गाच्या या खेळात केवळ आंबा पिकच नाही तर केळी, फूलशेती आणि रब्बी हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा या पिकांनाही धोका निर्माण झाला आहे. आंब्याचा मोहर काळवंडत आहे त्याच प्रमाणे ज्वारीची कणसे आणि गव्हाच्या लोंब्या देखील काळवंडत आहे. एकंदरीत निसर्गाच्या लहरीपणाचा गेल्या वर्षभरापासून परिणाम होत आहे. वर्षभरात गरजेच्या वेळी नाही तर अवेळी झालेल्या पावसामुळे आणि बदलामुळे केवळ नुकसानच शेतकऱ्यांच्या पदरी पडलेले आहे.
बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळाचा परिणाम
बंगालच्या उपसागरात आसानी चक्रीवादळ निर्माण झाले आहे. त्याचाच परिणाम आता महाराष्ट्रात जाणवू लागला आहे. त्यामुळेच कोकणातील रत्नागिरी, गुहागर, चिपळूण, खेड दापोली या परिसरात मंगळवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण आहे. दुपारपर्यंत सूर्याचं दर्शन न झाल्याने आंबा बागायतदार चिंतेत आहेत. गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने आंब्यावरील मोहोळ काळवंडला असून आंब्याच्या पीक यावर्षी फुकट जाण्याची भीती शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जाते. वातावरणातील बदलाचा सर्वाधिक परिणाम हा आंबा उत्पादकांवर झालेला आहे.
सुगीची लगबग त्यात ढगाळ वातावरण
कोकणाप्रमाणेच मराठवाड्यातही गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. सध्या रब्बी हंगामातील पिकांची काढणी कामे सुरु असतानाच या वातावरणामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढलेली आहे. ज्वारी पीक काढून वावरातच आहे तर दुसरीकडे गहू, हरभरा, उन्हाळी सोयाबीन हे वावरातच उभे आहे. सकाळी उजाडल्यापासूनच ढगाळ वातावरण असल्यामुळे ज्वारी काळंवडंत आहे तर इतर पिकांवर कीडीचा प्रादुर्भाव वाढत आहे. वातावरणातील बदल शेतकऱ्यांसाठी नुकसानीचा ठरत आहे.
आंबे आणि मोहरही गळाला
दोन दिवसांपूर्वी वाढत्या ऊन्हामुळे आंबागळतीचे प्रमाण वाढले होते. तर आता ढगाळ वातावरणामुळे परिपक्व होण्यापूर्वीच आंबागळ आंबागळ तर होतच आहे पण मोहरही तुटून पडत आहे. हंगामाच्या सुरवातीपासूनच आंबा पिकावर निसर्गाची अवकृपाच राहिलेली आहे. आतापर्यंत आंब्याच्या दर्जावर परिणाम होत होता आता थेट उत्पादनावरच परिणाम होऊ लागल्याने आंबा उत्पादक शेतकरी अडचणीत आहे.