पुन्हा बाजार समित्या बंद; शेतकरी हवालदिल
मध्यंतरी धुलिवंदन आणि रंगपंचमीमुळे राज्यातील मुख्य बाजार समित्यांचे व्यवहार हे बंद होते. सलग चार ते पाच दिवस व्यवहार ठप्प असल्याने शेतकऱ्यांची अडचण झाली होती. याला 15 दिवसाचा कालावधी लोटला असताना आता दोन दिवसांपासून वाशिम तर सोमवारपासून जिल्ह्यातील रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यवहार हे ठप्प राहणार आहेत. सध्या मार्च महिन्याचा अखेरचा टप्पा आहे. आर्थिक वर्ष संपत असल्याने सर्व व्यवहार सुरळीत होण्याच्या दृष्टीने बाजार समितीने हा निर्णय घेतला आहे. रिसोड कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत खरेदीदार,अडते असोसिएशनने नाणे टंचाई व आर्थिक वर्ष संपत असल्यामुळे बाजार समितीमधील शेतमाल खरेदी विक्रीचे व्यवहार 3 एप्रिलपर्यंत बंद असणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची मात्र अडचण होणार आहे. या दरम्यानच्या काळात इतर पर्याय शेतकऱ्यांसमोर असणे गरजेचे होते. मात्र, त्या संदर्भात कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.
शेतीमालाची आवक सुरु असतानाच निर्णय
सध्या खरिपासह रब्बी हंगामातील पिकांची आवक सुरु आहे. सोयाबीन, तूर, हरभरा याची आवक सुरु असतानाच बाजार समितीने आशा प्रकारे निर्णय घेतला आहे. त्यामुळे शेतीमालाची विक्री करावी कुठे हा प्रश्न आहे. राज्यात केवळ हरभरा आणि तुरीसाठी हमीभाव केंद्र उभारण्यात आली आहेत. यातच तुरीला हमीभावापेक्षा बाजारपेठेत अधिकचा दर आहे. त्यामुळे खरेदी केंद्रावर विक्री केली तर ते नुकसानीचे ठरणार आहे. दरम्यानच्या काळात नाफेडने उभारलेली खरेदी केंद्र ही सुरु राहणार आहेत. त्यामुळे या दरम्यानच्या काळात हरभरा केंद्रावर नोंदी आणि खरेदीही वाढेल असा अंदाज आहे.
खासगी व्यापाऱ्यांकडून होऊ शकते लूट
सध्या बाजार समितीमधील संपूर्ण वर्षभराचे व्यवहार पूर्ण करण्याच्या उद्देशाने समिती बंदचा निर्णय घेण्यात आला आहे. या दरम्यान, व्यापाऱ्यांनी खरेदी सुरु ठेवली तर मनमानी दर शेतीमालाला दिला जाईल यामुळेच बाजार समिती प्रशासनाने व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. खरीप हंगामातील सोयाबीन आणि रब्बी हंगामातील हरभऱ्याची आवक वाढली असतानाच हा निर्णय झाला आहे.
शेतकऱ्यांकडे पर्याय काय?
दरम्यानच्या सात दिवसांमध्ये शेतकऱ्यांना एकतर हमीभाव केंद्राचा आधार घ्यावा लागणार आहे किंवा इतरत्र बाजार समितीमध्ये शेतीमालाची विक्री करावी लागणार आहे. शिवाय शेतीमालाची साठवणूक केली तर अधिकचा फायदा होणार आहे. मात्र, खासगी व्यापाऱ्यांकडे अधिकचा माल विक्री करुन नुकसान करुन घेऊ नये असे आवाहन बाजार समितीचे सचिव विजय देशमुख यांनी केले आहे.