माथाडी कामगारांचा मुंबई APMC प्रशासकीय कार्यालयाचा ताबा; ८ तासांनंतर आंदोलन मागे
कांदा बटाटा मार्केटमध्ये व्यापाऱ्याने ५० किलो पेक्षा जास्त गोणी मागवल्याने माथाडी कामगार यांनी थेट एपीएमसी प्रशासकीय इमारती मध्ये सकाळी ८ पासून शेकडो कामगारांनी आंदोलन सुरू केले. सचिव, सभापती आणि इतर अधिकाऱ्यांच्या दालना बाहेर हे ठिया आंदोलन सुरू केले होते. माथाडी नेता नरेंद्र पाटील आणि माथाडी कामगार युनियन सरचिटणीस चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ठिय्या आंदोलन करण्यात आले होते. मात्र व्यापाऱ्यांनी संबंधित विषयावर सहकार्याची भूमिका स्पष्ट केल्याने आंदोलन मागे घेण्यात आल्याची माहिती माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी दिली. .
व्यापाऱ्यांना वारंवार इशारा देऊन सुद्धा व्यापारी गोण्या मध्ये ५० किलो पेक्षा जास्त माल मागवत असल्यामुळे कामगारांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. मुंबई एपीएमसी कांदा बटाटा मार्केट बंद करून माथाडी कामगारांच्या आंदोलन सुरु होते. बाजारात जवळपास ३०० गाड्यांची आवक झाली असून हा शेतमाल असाच पडून आहे. तर आलेला शेतमाल बाजार आवारात ग्राहक विना पडून राहली आहे. सहकार व पणन मंत्री यांचे आदेश असताना देखील व्यापारी ५० किलोपेक्षा अधिक वजनाचा माल मागवत आहेत. शिवाय व्यापाऱ्यांनी कोणती सूचना न देता बंद केल्याने माथाडी कामगारांनी तीव्र नाराजी व्यक्त करत हे आंदोलन हातात घेतले. या दरम्यान ५० किलोचाच माल आला पाहिजे अशी घोषणाबाजी करण्यात आली.
त्यामुळे कांदा बटाटा मार्केट बंद करण्यात आले असून शेकडो कामगार प्रशासकीय इमारतीत बसून भजन आणि घोषणाबाजी करत होते. मागण्या मान्य करा नाही तर आम्ही उठणार नसल्याचा इशारा यावेळी कामगारांनी दिला होता.
केंद्र सरकार आणि राज्य सरकार ने केलेल्या कायद्याची अंमलबजावणी व्हावी म्हणून आमची संघटना २०१९ पासून प्रयत्न करत होती. कोरोना महामारीत आम्ही त्याकडे दुर्लक्ष केले परंतू व्यापाऱ्यांनी आमच्यावर दया माया दाखवली नाही. पणन मंत्र्यांशी बैठक घेऊन त्यांनी देखील याबाबत त्यांनी स्पष्ट भूमिका घेतली. काही व्यापारी जाणीवपूर्वक अधिक वजनाचा माल घेऊन येत होते. त्यावर बाजार समिती पंचनामे करत होती. मात्र, त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नव्हती. व्यापार अडचणीत येत असल्याची भूमिका व्यापाऱ्यांनी मांडली. तसेच शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याचे सांगत त्याला सर्वस्वी माथाडी कामगार जबाबदार धरून मार्केट बंदची भूमिका त्यांनी घेतली. त्यामुळे आम्ही पण माघार घेणार नसल्याचे नेते नरेंद्र पाटील यांनी सांगितले. तसेच यावर व्यापाऱ्यांनी त्यांची भुमीका स्पष्ट करावी, तसेच बाजार समितीने कारवाईचे परिपत्रक काढावे अन्यथा उद्यापासून पाचही मार्केट बंद करून आंदोलन करू असाही इशारा पाटील यांनी दिला होता. मात्र आता बाजार समिती प्रशासन आणि व्यापाऱ्यांनी सकरात्मक भूमिका घेतल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.
जोपर्यंत राज्यातील सर्व बाजारपेठांमध्ये हा नियम लागून होणार नाही. तोपर्यंत हा त्रास राहणार आहे. त्यामुळे या सर्व बाजारपेठांमध्ये त्यांची अंमलबजावणी करावी. माथाडींच्या आरोग्याची काळजी आम्हाला सुद्धा आहे. १८ तारखेला माथाडी सरचिटणीस चंद्रकांत पाटील, मुकादम आणि काही व्यापाऱ्यांची बैठक झाली. त्यात सविस्तर चर्चा होऊन सर्वाना नम्र निवेदन देण्यात आले. सोमवार पासून सुरळीत काम करावे असे ठरले असल्याचे व्यापारी राजू मणियार यांनी सांगितले. पणन आणि APMC ने   ३०२ बाजार समित्यांमध्ये हा नियम कडक केला पाहिजे. बाजार समितीने हा माल मार्केट आवारात घेऊ नये. असे झाल्यास व्यापारी आणि माथाडी कामगारांचे वाद होणार नाहीत असे व्यापारी संजय पिंगळे यांनी सांगितले.