आंबा विक्री महोत्सवासाठी मिळणार आवश्यक निधी; वाचा सविस्तर
पणन विभागामार्फत रत्नागिरीत आयोजित करण्यात येणाऱ्या आंबा विक्री महोत्सवासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून द्या, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला दिल्या. हा महोत्सव एप्रिल महिन्यात भरवण्याविषयी सूचना केली.
खेड भरणे येथील एका खासगी हॉटेलमध्ये झालेल्या प्रशासकीय आढावा बैठकीत ते बोलत होते. या वेळी राज्यमंत्री आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे, आमदार भास्कर जाधव, जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदूराणी जाखड, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांच्यासह प्रमुख अधिकारी उपस्थित होते. या प्रसंगी उपमुख्यमंत्री पवार यांनी विविध शासकीय विभागातील विकास कामांबाबत सविस्तर आढावा घेतला. प्रशासकीय कामांना येणाऱ्या अडचणींबाबत विचारणा करून येणाऱ्या अडचणींचे निराकरण करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
आंबा निर्यातीसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही दिले. रब्बी हंगाम क्षेत्र विस्तार मोहिमेंतर्गत कुळीथ, चवळी, पावटा, वाल व भाजीपाला या पिकांचे उत्पादन वाढविण्याबाबत सूचना केल्या.
रत्नागिरी जिल्हा परिषद नूतन इमारतीच्या बांधकामाचा आढावा त्यांनी घेतला. जिल्ह्यातील विश्रामगृहांच्या दुरुस्तींचे प्रस्ताव तत्काळ सादर करून दुरुस्ती करून घ्यावी, अशा सूचना केल्या. तसेच, जिल्हा परिषदेला आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्र्यांनी दिले. जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालय, सागरी सुरक्षा प्रशिक्षण केंद्र, पोलिस वसाहतींची पुनर्बांधणी, फायरिंग रेंजसाठी निधी दिला जाईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्र्यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. गर्ग यांना दिला.
‘धावपट्टीची लांबी वाढवीणे आवश्यक’
रत्नागिरी विमानतळाला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळावा यासाठी धावपट्टीची लांबी वाढविणे आवश्यक आहे. तसेच ‘रत्नागिरी-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्ग १६६’च्या निर्मितीकरिता भारत सरकारकडून काही अडचणी असल्यास त्याचे निराकरण माझ्यास्तरावर करेन, असे आश्वासनही दिले. भूसंपादनात जमिनी गेलेल्या भूधारकांना तात्काळ मोबदला मिळावा, यासाठी प्रशासनाने विशेष प्रयत्न करावेत,असेही ते म्हणाले.
रेवस ते रेड्डी महामार्गासाठी दहा हजार कोटी
कोकणातील पर्यटनाला चालना देण्यासाठी रेवस ते रेड्डी सागरी महामार्गाला दहा हजार कोटी आघाडी सरकारने दिले. या महामार्गावरील प्रमुख ९५ पर्यटनस्थळांना जोडण्याचा प्रयत्न आहे. आता पर्यटनाला चालना देण्यासाठी स्थानिक बेरोजगार युवक-युवतींना जिल्हा बँकेने पतपुरवठा करावा, अशी अपेक्षा पवार यांनी व्यक्त केली.