सोलापूर बाजार समितीमध्ये कांदा तेजीत; सरकारच्या निर्णयानंतर कांदा ३५ रुपये प्रतिकिलो
एकाच महिन्यात दोन वेळा कांद्याची विक्रमी आवक शिवाय वाढत्या आवकमुळे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यवहारही काही दिवस बंद ठेवण्यात आले होते. असे असतानाही कांदा दरात घसरण झाली नव्हती. यानंतरही सरासरीप्रमाणे दर मिळत असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता. देशात विशेषत: महाराष्ट्रात कांद्याची आवक वाढूनही दर कमी होत नसल्याने यामध्ये केंद्र सरकारलाच हस्तक्षेप करावा लागला आहे. कांद्याचे दर नियंत्रणात आणण्यासाठी केंद्राने साठवणूकीतला कांदा बाजार समित्यांमध्ये पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील लासलगाव आणि पिंपळगाव बाजार समितीमध्ये कांदा आवकही सुरु झाली आहे. असे असले तरी या निर्णयाचा परिणाम हा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर झालेला नाही. उलट येथील दरात सुधारणा झाली असून प्रति क्विंटल सरासरी 3 हजार 500 रुपये दर मिळत आहे. लासलगाव पाठोपाठ सर्वात मोठी असलेल्या बाजारपेठेत कांद्याची आवक सध्या कमी झाली असली तरी दर मात्र टिकूण आहेत.
गेल्या महिन्यापासून कांद्याच्या दरात वाढ होत आहे. सध्या खरीप हंगामातील कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात असतानाही असेच चित्र आहे. त्यामुळे ग्राहकांना अधिकच्या दरात कांद्याची खरेदी करावी लागत आहे. कांद्याचे दर नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने राज्यातील काही बाजार समित्यांना टार्गेट करीत साठवणूकीतला कांदा थेट या बाजार समित्यांना पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दर कमी होतील असे चित्र होते. पण सोलापूरातील मार्केटमध्ये दर टिकूनच नाही तर यामध्ये वाढ होत आहे.
जानेवारी महिन्यात एक लाख क्विंटलहून अधिकची कांद्याची आवक ही सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झाली होती. या दरम्यान जिल्हाभरातून तर आवक होतीच पण मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमधूही कांदा मार्केटमध्ये दाखल होत होता. असे असले तरी दरात घट झाली नव्हती. आता महिन्याभरानंतर आवक घटली असल्याने कांदा दरात वाढ झाली आहे. चांगल्या प्रतीच्या कांद्याला 35 रुपये किलो असा दर मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्येही समाधान आहे.
मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती एक नवा पर्याय म्हणून समोर येत आहे. येथील चोख व्यवहार आणि कांदा साठवणूकीची क्षमता यामुळे शेतकऱ्यांचा विश्वास दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या खरिपातील कांदा अंतिम टप्प्यात असतानाही दिवसाकाठी 300 ते 400 ट्रकमधून आवक सुरु असल्याचे बाजार समितीच्या प्रशासनाने सांगितले आहे. 100 रुपये क्विंटलपासून ते 3 हजार 500 पर्यंतचा दर येथील बाजार समितीमध्ये आहे.