PUNE बाजार समितीचा अजब-गजब कारभार; परराज्यातून येणाऱ्या वाहतूकदारांकडून तिप्पट वसुली!
पुणे गुलटेकडी बाजारात १० चे ३० बाजार समितीची  परराज्याबाहेर बदनामी
पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कांदा-बटाटा गुलटेकडी मार्केटमध्ये १० रुपयाची पावती देऊन ३० रुपये घेतले जात आहे. त्यामुळे १० रुपयाच्या पावतीवर २० रुपये कमाई कोणाच्या घशात जाते असा सवाल उपस्थित होत आहे. मार्केटमध्ये राज्यासह बाहेरून येणाऱ्या शेतमाल वाहतूकदारांकडून आवक गेटवर बेकायदेशीर वसुली केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामध्ये वाहतूकदार त्रस्त झाले असून संताप व्यक्त करत आहेत. तर तक्रार करायची तर कोणाकडे असा प्रश्न त्यांना सतावत आहे. बाजाराच्या आवक गेटवर वाहनांकडून नियमबाह्य वसुली करण्यात येत आहे. शिवाय विचारणा केली असता तीस रुपयेच लागतात असे वाहतूकदारांना सांगितले जात आहेत. शिवाय सगळ्या वाहनांकडून हि वसुली होत असल्याचे वाहतूकदार सांगत आहे. त्यामुळे दिवसाला हजारो, महिन्याला लाखो तर वर्षाला करोडो रुपयांचा घोटाळा होत असल्याचे दिसत आहे.
या परिसरात कांदा-बटाटा, फळ आणि भाजीपाला मार्केट आहे. त्यामुळे या ठिकाणी येत असलेल्या गाड्यांची आवक लक्षात घेता. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बेकायदा वसुली सुरु असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे हे अधिकचे पैसे वसूलणाऱ्या भ्रष्टाचारी कर्मचारी व अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे. या सुरु असलेला निंदनीय प्रकाराबाबत पुणे बाजार समितीचे प्रशासक धनपत गरड काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, तरीदेखील हा प्रकार राजरोसपणे सुरु असून पुणे बाजार समितीची राज्यासह राज्याबाहेर मोठ्या प्रमाणात बदनामी होत आहे. गेल्या आठवड्यातच कार्यकारी अभियंता आणि उपअभियंता यांच्यावर लाच प्रकरणी कारवाई झाली होती.
या मार्केटमध्ये विविध शेतमाल परराज्यातून येत असतात. त्यामुळे या वाहन चालकांना मराठी भाषा तसेच येथील कार्यपद्धती समजणे कठीण जाते. याचाच फायदा घेऊन पावतीवरील नमूद रक्कमेपेक्षा तिप्पट पैसे घेण्यात येतात. शिवाय पावतीवरील मराठी आकडे या गाडी चालकांना कळत नाही. तर एखाद्या वाहन चालकाने याबाबत विचारणा केली असता एवढेच पैसे द्यावी लागतील असे सांगण्यात येते. त्यामुळे चालक आपला वेळ वाचवण्यासाठी तसेच अधिकाऱ्यांची दमदाटी टाळण्यासाठी गपगुमान कर्मचारी मागेल तेवढे पैसे काढून देतात. अधिकाराचा गैरवापर करून हा भ्रष्टाचार सुरु असल्याचे समोर येत आहे. संबंधित प्रकाराची माहिती घेऊन संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल अशी माहिती पुणे बाजार समिती प्रशासक धनपत गरड यांनी दिली.