नवी मुंबई महापालिकेच्या प्रभाग रचनांवर हरकतींचा पाऊस; पालिकेला करावा लागणार विचार
नवी मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या प्रभाग रचनेमध्ये विशिष्ट राजकीय पक्षांना फायदा पोचवण्यासाठी प्रभागांची मोडतोड करण्यात आल्याचा आरोप करत याविरोधात सोमवारी शेवटच्या दिवशी भाजपाच्यावतीने मुख्य निवडणूक अधिकारी तथा महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे मोठ्या संख्येने हरकती आणि सूचना सादर करण्यात आल्या. दरम्यान पालिका मुख्यालयात आणि विविध प्रभाग कार्यालयांमध्ये ३८५२ हरकती आणि सूचना दाखल करण्यात आल्या आहेत. तर नवी मुंबई महापालिका प्रभाग रचनेवर सर्व पक्षांच्या हरकती आहेत. निवडणूक अयोग्य आणि नवी मुंबई महापालिकेने या हरकतींचा अभ्यास करून योग्य निर्णय घेतला पाहिजे. प्रभाग रचनेचा पुन्हा सर्वे करून ज्यांनी रास्त हरकती घेतल्या आहे. त्यांना न्याय दिला पाहिजे अशी भूमिका आमदार शशिकांत शिंदे यांनी घेतली आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार महापालिकेच्या निवडणूक विभागाने नवीन प्रभाग रचना तयार करून ती १ फेब्रुवारी २०२२ रोजी प्रसिद्ध केली. नवीन प्रभाग रचनेत नियमांचे सर्रास उल्लंघन झाल्याचा आरोप भाजपाने केला आहे. महापालिकेच्या काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून विशिष्ट राजकीय पक्षाने त्याला फायदेशीर ठरेल अशी प्रभाग रचना करून घेतली आहे. दिघा, ऐरोली, रबाळे, घणसोली, कोपरखैरणे, वाशी, नेरूळ, बेलापूर व अन्य सर्व नोडमधील प्रभागांमध्ये सदोष प्रभाग रचना करण्यात आल्या आहेत.
नियमबाह्य पद्धतीने दलित वस्त्यांचे विभाजन करण्यात आले आहे. त्यामुळे मागास वर्गीयांना प्रतिनिधित्व मिळणार नाही. माजी महापौर सुधाकर सोनावणे यांचा प्रभाग क्रमांक ११ हा थेट महापे पर्यंत नेण्यात आला आहे. भौगोलिक दृष्ट्या प्रभागांची रचना न करता ते सोयीस्कररित्या वाढवण्यात अथवा कमी करण्यात आले आहेत. यात गावे देखील विभागली गेली आहेत असे आरोप भाजपाने केले आहेत. २०११ च्या जनगणनेच्या आधारे प्रभाग रचना करण्यात आल्याचा आरोप भाजपाने केला आहे. अनेक प्रभागांमध्ये जाणून बुजून बेकायदा बदल आणि सीमांकन करण्यात आले आहे. भाजपाच्या मातब्बर नगरसेवकांचे प्रभाग तोडण्यात आल्याचा आरोप भाजपाने केला आहे.
सदोष प्रभाग रचना विरोधात राज्यघटनेच्या कलम २२६ अन्वये उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्याची तरतूद उपलब्ध आहे. चुकीच्या आणि मनमानी पद्धतीने केलेली प्रभाग रचना जर दुरुस्त केली नाही तर याविरोधात उच्च न्यायालयात दाद मागण्याचा इशारा भारतीय जनता पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे.
प्रभाग रचनेचे निकष उल्लंघन करून वस्त्यांचे आणि विशेष करून मागासवर्गीय वस्त्यांचे बेकायदा विभाजन करण्यात आले आहे. याचा मोठा परिणाम मागासवर्गीय अनुसूचित जाती आणि जमातीच्या आरक्षणात होणार आहे. इलठण पाडा, विष्णुनगर वस्तीचे तीन भागात विभाजन करण्यात आले आहे आंबेडकर नगर वस्तीचे दोन ते तीन भाग चिंचपाड्याला जोडण्यात आले आहेत. पूर्वी हा संपूर्ण भाग प्रभाग १९ मध्ये होता. आंबेडकर नगर, भीम नगर, कातकरी पाडा, निबान टेकडी, गौतम नगर हे सर्व भाग भौगोलिक दृष्ट्या एकसंघ आहे. त्याचे दोन तुकडे केले असून एक भाग चिंचपाडा तर दुसरा भाग महापेला जोडला आहे. चिंचपाडासाठी ऐरोली तर महापेसाठी कोपरखैरणे प्रभाग कार्यालय आहे. नागरिकांची मोठी गैरसोय होणार आहे.
सदोष प्रभाग रचना विरोधात राज्यघटनेच्या कलम २२६ अन्वये उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्याची तरतूद उपलब्ध आहे. चुकीच्या आणि मनमानी पद्धतीने केलेली प्रभाग रचना जर दुरुस्त केली नाही तर याविरोधात उच्च न्यायालयात दाद मागण्याचा इशारा भारतीय जनता पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे.