हाडाच्या कर्करोगाची लक्षणे वाचा आणि सावध व्हा!
विविध कर्करोगांमधील एक म्हणजे हाडांचा कर्करोग (Bone Cancer). गेल्या काही वर्षांचा विचार केल्यास लहान मुलांसह ज्येष्ठांमध्येही हाडांच्या कर्करोगाचे प्रमाण वाढलेले दिसत आहे. हाडांमधील सामान्य पेशी नियंत्रणाबाहेर वाढतात तेव्हा हाडांचा कर्करोग होत असतो. सामान्य हाडांच्या पेशींवर आक्रमण करुन झपाट्याने वाढत असतात. त्याच प्रमाणे हा कर्करोग शरीराच्या इतरही भागांमध्ये पसरुन आपले दुष्परिणाम दाखवत असतो. या ट्यूमरला (Tumor) कर्करोग म्हटले जाते. हाडांमधील हा अतिशय दुर्मिळ कर्करोगाचा प्रकार आहे. हा कर्करोग मानवी शरीरातील कोणत्याही हाडापासून सुरू होऊ शकते. मुख्यत्वे हात, पायांच्या लांब हाडांवर याचा सर्वाधिक दुष्परिणाम जाणवत असतो. हाडांच्या कर्करोगाचे काही प्रकार मुलांसह प्रौढांवर परिणाम करतात. हाडांच्या कर्करोगावर केमोथेरपी (Chemotherapy) आणि रेडिओथेरपी देखील केली जाऊ शकते.
हाडांच्या कर्करोगावरील उपचार यशस्वी होत असतात. कर्करोगाची समस्या पुन्हा निर्माण होतेय की नाही याबाबत वारंवार तज्ज्ञांचा सल्ला घेत राहिले पाहिजे. हाडांचा कर्करोग असलेले 75 टक्क्यांहून अधिक लोक किमान 5 वर्षे जगतात. हाडांच्या कर्करोगाची लक्षणे वेळीच ओळखल्यास व त्याचे निदान झाल्यास त्यावर मात करता येणे सहज शक्य असते.
हाडांच्या दुखण्याकडे अनेकदा किरकोळ समस्या म्हणून दुर्लक्ष केले जाते. मात्र, हे दुखणे कमी होण्याऐवजी वाढत असेल तर ते हाडांच्या कर्करोगाचे लक्षण असू शकते, हाडांच्या कुठल्याही त्रासाकडे दुर्लक्ष करणे जीवघेणे ठरु शकते. त्यामुळे अशा वेळी तज्ज्ञांचा सल्ला घेत आपली तपासणी करुन घ्यावी.
शरीराच्या कोणत्याही भागात वेगळ्या प्रकारच्या गाठी निर्माण होणे किंवा शरीराला किंवा हाडाला सूज येणे धोक्याची घंटा ठरु शकते. त्याकडेही दुर्लक्ष करता कामा नये. काही प्रकारची सूज कालांतराने कमी होते, परंतु हाडांच्या कर्करोगाच्या बाबतीत, जिथे वेदना जाणवते तिथे देखील सूज येऊ शकते.
कमकुवत हाडे असली की किरकोळ कारणांमुळेही फ्रॅक्चर होऊ शकते. हाडांच्या कर्करोगामुळे हाडे कमकुवत होतात, ज्यामुळे वारंवार फ्रॅक्चर होतात. लहान मुलांमध्ये याचे प्रमाण अधिक दिसून येत असते. त्यामुळे किरकोळ कारणांमुळे हाडे ठिसूळ होउन मोडली जात असतील तर अशा वेळी योग्य तपासणी करुन घ्यावी
मज्जातंतूंना काही जखमा झाल्या असतील तेव्हा सुन्नपणा आणि मुंग्या येणे शक्य असते. हाडांच्या कर्करोगाच्या बाबतीत, ट्यूमरच्या वाढीमुळे नसांना गंभीर दुखापत होत असते. ज्यामुळे आपल्या संवेदना मरुन जातात. आपल्याला कसलीही जाणीव होत नाही. हेदेखील हाडांच्या कर्करोगाचे लक्षण आहे.
सांध्यातील कडकपणा, ताठरपणा कालांतराने कमी होतो. त्याकडे दुर्लक्ष न करता त्यावरील निदान करावे, त्यावर उपचार न केल्यास आपल्या रोजच्या क्रियाकलापावरही याचा परिणाम होत असतो. त्यामुळे याबाबत तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.