मुंबई APMC मार्केटमध्ये RTI कार्यकर्त्यांचा सुळसुळाट; काही RTI कार्यकर्ते पोलिसांच्या रडारवर
माहिती अधिकारी कायदा प्रशासकीय यंत्रणा सुधारण्यासाठी वापरला जातो. जेणे करून प्रशासन आणि सरकार यांच्याकडून कायदयात आणि नियमांमध्ये काम करून घेण्यासाठी या कायदाच जन्म झाला आहे. त्यामुळे माहिती अधिकार हा लोकांच्या हिताचा, प्रशासनाच्या योग्य कामकाजासाठी वापरून सगळ्यांच्या हिताचा असावा. मात्र, बाजार समितीमध्ये माहिती अधिकाराचा दुरुपयोग करून काही RTI कार्यकर्त्यांचा सुळसुळाट झाला आहे.
माहिती अधिकार कायद्याचा दुरुपयोग करून व्यापारी, ठेकेदार तसेच बाजार समितीच्या अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करणाऱ्या आणि तथाकथित कार्यकर्त्यांविरोधात कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे. सरकारी कामावर वचक बसविण्यासाठी सर्वसामान्यांना माहिती अधिकाराचे शस्त्र हाती देण्यात आले आहे. अशावेळी काही माहिती अधिकार कार्यकर्त्यांचा अपवाद वगळता अनेक माहिती अधिकाऱयांनी या कायद्याच्या नावाखाली आपली दुकानदारी सुरु केली आहे. त्याचा फटका केवळ सरकारी भ्रष्ट अधिकाऱयांना बसत नसून अनेक कर्तव्यदक्ष अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना बसू लागला आहे.
बाजार समितीचे उत्पन्न वाढीसाठी प्रयन्त सुरु असताना काही व्यापारी आणि तथाकथित कार्यकर्ते जाणीवपूर्वक आरटीआय अर्ज टाकून माहिती मागवतात आणि महत्वाच्या कामापासूनच विचलित करतात असे झाल्याने बाजार समितीच्या उत्पन्न वाढीवर परिणाम होत आहे. तर बाजार समितीच्या विकासात माहिती अधिकार कार्यकर्त्यांकडून अडथळा निर्माण केला जात आहे. त्याचा परिणाम म्हणून समाजाच्या खऱ्या अर्थाने विकास होण्यासाठी माहिती अधिकाराचा वापर करणाऱ्या नागरिकांकडेही पाहण्याचा दृष्टीकोन या निमित्ताने बदलू लागला आहे.
मुंबई कृषी उप्तन्न बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात माहिती अधिकार कार्यकर्ते ऍक्टिव्ह झाले आहेत. बाजार समितीमध्ये सुरु असलेला भ्रष्टचार आणि भोंगळ कारभारामुळे अनेक माहिती अधिकार कार्यकर्ते संबंधित माहिती मागवत असतात. मात्र सध्या उठसूट कोणत्याही विषयावर आणि अनावश्यक माहिती मागवण्यात येत आहे. जवळपास २५ ते ३० तथाकथित माहिती अधिकार कार्यकर्ते बाजार आवारात हिंडत असल्याचे बोलले जात आहे.
शिवाय काही अनधिकृत व्यापारावर अधिकारी कारवाईसाठी गेल्यास त्यांना माहिती अधिकार टाकण्याची धमकी दिली जाते. तर या कार्यकर्त्यांना बाजार समितीमधीलच अधिकारी आणि कर्मचारी माहिती देऊन माहिती अधिकार टाकण्यास सांगत असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. बाजार समितीच्या कारवाई दरम्यान हे कार्यकर्ते कार्यरत होतात आणि दमदाटी देऊन अवैध धंदे करून घेत आहेत. त्यामुळे आता हे कार्यकर्ते पोलिसांच्या रडारवर आले आहेत.
व्यापाऱ्याची आवक, सेस आणि गाळ्यावरील अनधिकृत व्यापार कारवाई दरम्यान माहिती अधिकाराचा दुरुपयोग करून अधिकाऱ्यांचे लक्ष विचलित करण्यात येत आहेत. माहितीचा अधिकार टाकून कारवाई दरम्यान अडथळा आणण्याचे काम सुरु केले जात आहे. गैरप्रकारासाठी बाजार समितीने परवानगी नाकारल्यास माहिती अधिकार टाकण्याचे काम या लोकांकडून केले जात आहे. तर माहिती अधिकाराचा वापर करून त्रास देणाऱ्या लोकांवर अंकुश येणे आवश्यक आहे.
त्यामुळे माहिती अधिकार कायद्याचा दुरुपयोग करून वारंवार खोट्या तक्रारी दाखल करणाऱ्या तथाकथित कार्यकर्त्यांना आळा घालण्यासाठी पोलीस सज्ज झाले असून येत्या काही काळात बोगस आणि तथाकथित कार्यकर्ते पोलिसांच्या जाळ्यात असणार आहेत.