अद्याप मिरचीचा ठसका कायम; गृहिणींचे बजेट कोलमडले
राज्यात यंदा मिरची उत्पादक शेतकरी समाधानी असल्याचे सांगण्यात येत आहे. राज्यात सर्वच बाजारपेठांमध्ये मिरचीला चांगला दर मिळत आहे. सध्या येऊ घातलेल्या उन्हाळ्यात मसाला बनवण्यासाठी महिला वर्ग तयार झाला आहे. त्यामुळे मिरची चांगलीच तेजीत असल्याचे दिसते. बाजारपेठांमध्ये सध्या लाल मिरचीला १६ हजार ते 25 हजार रुपये क्विंटलला दर मिळत आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये देखील लाल मिरचीला चांगलीच मागणी वाढली असल्याचे व्यापारी सांगत आहेत. तर महिला मसाला खरेदीला गर्दी करू लागल्या आहेत.
मागील काही वर्षांच्या तुलनेत यंदा मिरचीच्या दरात वाढ झाली आहे. शिवाय लवंगी, बेगडी, शंखेश्वरी आणि तेजा या मिरच्या मसाल्यासाठी मोठ्या प्रमाणात विकत घेतल्या जातात. तर यंदा तेजा मिरचीही तेजीत असल्याचे सांगण्यात येत आहे. तर आवक कमी झाल्यामुळे मिरचीच्या दराने उसळी घेतली आहे. शिवाय भविष्यात दरात अणखीन वाढ होणार असल्याचा अंदाज काही व्यापारी व्यक्त करीत आहेत. तर येत्या महिन्याभरात दर ४० ते ५० रुपयांनी कमी होण्याचा अंदाज काही व्यापारी बांधत आहेत.
महाराष्ट्र राज्याबाहेरून येत असलेल्या लाल मिरचीची संपूर्ण काढणी झालेली नाही. याच परस्थितीचा फायदा इतर भागातील शेतकरी घेत असून त्यांना चांगला दर मिळत आहे. तर अवकाळी पाऊस आणि गारपिटीने झालेल्या परिणामामुळे मिरचीचे उत्पादन पाहता मिरचीचे दर चढेच राहण्याचा अंदाज व्यक्त होत आहे. इतर राज्यातील मिरची तोडणीला सुरुवात झाल्यास तुलनेने काहीअंशी दर कमी होतील. मात्र गेल्या वर्षाच्या तुलनेत दर अधिकचे राहणार असे दिसत आहे. त्यामुळे उत्पादन घटले असले तरी यंदाच्या चढ्या दरामुळे शेतकऱ्यांनाच फायदा होणार आहे.
सध्या राज्यातील काही बाजारपेठांमध्ये मिरचीचा हंगाम शेवटच्या टप्यात आला असला तरी मिळत असलेल्या दराने शेतकरी समाधानी आहेत. शिवाय मिरचीची निर्यात देखील मोठ्या प्रमाणात सुरु असल्याने हे दर आपल्याला दिसून येत आहेत. मिरचीच्या जातीप्रमाणे सध्या मुंबई APMC बाजारात तेजा मिरची २३८, पांडी २२०, बेगडी ३२०, लवंगी २३५ तर शंखेश्वरी २८० रुपये प्रतिकिलो दरम्यान बाजारभाव आहेत.