मुंबई APMC भाजीपाला मार्केटचा अजब-गजब कारभार; द्राक्ष विक्रेत्यावर कारवाई तर कांदा बटाटा व्यापारी मोकाट
मुंबई APMC मार्केट बाहेरील अनधिकृत व्यापार रोखण्यासाठी बाजार समिती बैठकांवर बैठका घेत आहे. त्यामुळे बाजार समिती उत्पन्नात वाढ होणार हे निश्चित आहे. मात्र, या परिस्थितीत भाजीपाला मार्केटचा अजब गजब कारभार समोर आला आहे. या भाजीपाला मार्केटमध्ये भाजीपाला व्यापाऱ्याने द्राक्ष विक्री केल्याने व्यापाऱ्याला १० हजार रुपये दंड आकारण्यात आला होता. मात्र सप्लायच्या नावाखाली कांदा,बटाटा लसणाचा या ठिकाणी बिनधास्तपणे व्यापार केला जात आहे. सॅम्पलिंग आणि किरकोळ पद्धतीने या ठिकाणी कांदा, बटाटा आणि लसणाची विक्री सुरु आहे.
जर भाजीपाला बाजारात फळे विकल्याने कायदा आणि नियमांचे उल्लंघन होत असेल तर बाजार समितीचे कांदा-बटाटा मार्केट असताना या ठिकाणी कांदा, बटाटा आणि लसूण विक्रीने नियमांचे उल्लंघन होत नाही का? असा सवाल बाजार घटक करत आहेत. शिवाय भाजीपाला मार्केटच्या प्रत्येक पाकळीत हा व्यवसाय सर्रासपणे सुरु आहे. जर हा व्यवसाय नियमांमध्ये नसेल तर हा व्यवसाय कोणाच्या आशीर्वादाने सुरु आहे असा प्रश्न बाजार घटकांना पडला आहे. तर भाजीपाला मार्केटमध्ये थेट शेतकऱ्यांकडून कांदा, बटाटा आणि लसूण मागवला जात असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे अशाप्रकारच्या थेट व्यापारात बाजार समितीचा सेस बुडवला जात असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. त्यामुळे या व्यापारावर बाजार समिती का कारवाई करत नाही असा प्रश्न बाजार घटकांना पडला आहे.