दिवसा विद्युत पुरवठा केला जावा म्हणून शेतकऱ्यांचा अजब प्रकार
कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांमध्ये गेल्या काही दिवसांपासून जंगली प्राण्यांचा वावर वाढला आहे. यामध्ये साप तर सर्रास दिसत आहेत. आता शहरात असणाऱ्या या शासकीय कार्यालयांमध्ये साप कसे असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच? पण हे साप शेतकरीच आणून सोडत आहेत. आता दिवसा वीज पुरवठा सुरळीत देण्याच्या मागणीसाठी असा प्रकार केला जात होता. पण सांगली येथे तर रात्री साप आढळून आला की लागलीच त्याला जिल्हाधिकारी कार्यालयात सोडण्यात आले आहे. गेल्या पाच ते सहा दिवसांपासून असे प्रकार या दोन जिल्ह्यांमध्ये सुरु आहेत. केवळ महावितरणच नाही तर तहसील, जिल्हाधिकारी कार्यालयातही हे जंगली प्राणी सोडले जात आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या एका अव्हानानंतर हा प्रकार सुरु झाला आहे. रात्रीच्या ऐवजी दिवसा वीजपुरवठा व्हावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आहे.त्याच अनुशंगाने राजू शेट्टी यांचे आंदोलन सुरु केले आहे.
सध्या रब्बी हंगामातील भरण्याचे म्हणजेच पिकांना पाणी देण्याचे दिवस आहेत. नियमित पाणी दिले नाही तर उत्पादनात घट होणार आहे. सध्या महावितरणकडून नेमके रात्रीच्या वेळी विद्युत पुरवठा केला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना एक ना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. रात्रीच्या वेळी विंचू, साप यांचा वावर असल्याने शेतकऱ्यांच्या जिवितास धोका आहे. त्यामुळे दिवसा विद्युत पुरवठा करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आहे. शिवाय या मागणीसाठी राजू शेट्टी यांनी कोल्हापूरात आंदोलनही सुरु केले होते असे असताना याकडे दुर्लक्ष होत असल्याने पाणी देताना आढळलेले जंगली प्राणी थेट शासकीय कार्यालयात सोडण्याचे आदेश त्यांनी शेतकरी आणि पदाधिकाऱ्यांना दिले होते.
सांगलीमध्ये सांगली-इस्लामपूर रस्त्यावरील वीज वितरणचे कार्यालय पेटवून देण्यात आले आहे. तर दुसरीकडे पहाटेच्या सुमारास अज्ञात संतप्त शेतकऱ्यांनी शेतामध्ये पाणी पाजत असताना सापडलेले साप सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात सोडून देण्यात आले आहे. शेतात काम करीत असताना असे साप आढळून आले की थेट शासकीय कार्यलयांमध्ये सोडले जात आहेत. त्यामुळे जंगली प्राण्यांचा वावर असताना आम्ही शेतीकामे करायची कशी हे यामधून दाखवून द्यायचे आहे.
ऐन रब्बी हंगाम जोमात असताना केलेली सक्तीची वीजबिल वसूली तात्काळ थांबवून शेतकऱ्यांना मुदत देण्यात यावी, सध्या केवळ सात तासच विद्युत पुरवठा होत आहे. त्यामुळे पिकांना पाणी देणे शक्य नाही त्यामुळे नुकसान होत असून किमान 10 तास विद्युत पुरवठा करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. तर रात्रीच्या ऐवजी दिवसा विद्युत पुरवठा झाला तर शेतकऱ्यांना आपला जीव धोक्यात घालून शेतात जावे लागणार नाही. या मगण्या घेऊन राजू शेट्टी यांनी कोल्हापूरात आंदोलन केले आहे.