शेतकऱ्याचे पांढरे सोने चकाकले; कापसाला विक्रमी दर
हंगामाच्या सुरवातीपासूनच कापसाला सरासरीपेक्षा अधिकचा दर मिळाला आहे. पण संपूर्ण हंगाम दरा कायम राहण्याची ही पहिलीच वेळ आहे. शिवाय कापसाबाबत तर हे अधिकच वेगळे गणित मानले जात आहे. आता कापसाचे पीक शेताबाहेर असले तरी शेतकऱ्यांकडे साठवणूकीतला कापूस आहे. हंगामाच्या अंतिम टप्प्यात तर कापसाला विक्रमी दर मिळाला आहे. शिवाय दिवसाकाठी दरात वाढ ही सुरु आहे. मुख्य बाजारपेठ असलेल्या अकोट बाजार समितीमध्ये आठवड्याभरापासून 12 हजारापर्यंतचा दर मिळत आहे. पण वर्धा जिल्ह्यातील सेलू बाजार समितीने सर्व विक्रम मोडीत काढले आहे. कारण सोमवारी येथील बाजार समितीमध्ये कापसाला सोन्याप्रमाणे दर मिळाला आहे. तब्बल 1 हजार क्विंटल कापसाला 13 हजार 450 असा विक्रमी दर मिळाला आहे. जे गेल्या 50 वर्षात झाले नाही ते यंदाच्या हंगामात होताना पाहवयास मिळत आहे.
दिवसाकाठी होतेय कापसाच्या दरात वाढ
यंदा कापासाच्या दरात वाढ होऊन दर स्थिरावले होते. गेल्या अनेक दिवसांपासून 10 ते 11 हजारावर दर होते. पण आवक कमी होताच पुन्हा दरात वाढ झाली आहे. वर्धा जिल्ह्यातील सेलू या उपबाजारात गेल्या 4 दिवसांपासून दिवसाला 300 ते 400 रुपयांची वाढ होत आहे. हंगामात हे प्रथमच घडत आहे. सध्या शेतशिवारामध्ये कापूस उभा नसला तरी अनेक शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी याची साठवणूक करुन ठेवली आहे. याचा फायदा आता विक्रमी दर मिळाल्याने होत आहे. गतआठवड्यातील गुरुवारी 11 हजार 700, शुक्रवारी 12 हजार 400, शनिवारी 12 हजार 770 तर सोमवारी थेट 13 हजार 440 रुपये दर मिळाला आहे.
1 हजार वाहनांमधून कापसाची आवक
कापसाचा हंगाम अंतिम टप्प्यात असला तरी आता वाढीव दरामुळे साठवणूकीतला कापूस बाजारपेठेत दाखल होताना पाहवयास मिळत आहे. केवळ शेतकऱ्यांनीच कापसाची साठवणूक केली असे नाही तर व्यापाऱ्यांनीही भविष्याचा वेध घेत साठवणूक केली होती. सेलू सारख्या उपबाजार पेठेमध्ये तब्बल 187 वाहनांमधून कापसाची आवक झाली होती. वर्धा जिल्हासह लगतच्या भागातून ही आवक कायम आहे. असे असताना 1 हजार क्विंटल कापसाला 13 हजार 450 असा दर मिळाला आहे. त्यामुळे भविष्यात कापसाचे दर काय राहणार याकडे आता लक्ष आहे.
शासनाचा हस्कक्षेप नसल्याचाही परिणाम
शेतीमालाची आवक सुरु होताच शासनाचा त्यामध्ये हस्तक्षेप राहिला की दरात घट ही होतेच. पण यंदा शासनाने कोणताही हस्तक्षेप न केल्यामुळेच सोयाबीन, कापूस, हरभरा, तूर या शेतीमालाचे दर हे टिकून आहेत. शिवाय भविष्यामध्येही यामध्ये वाढ होणार असल्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी वर्तवलेला आहे.