कारखान्याने घेतल्या शेतकऱ्याचा बळी; वाचा सविस्तर
ऊसतोड न मिळाल्यामुळे जोहरापूर येथील शेतकऱ्याने केलेली आत्महत्या नसून, कारखानदार व व्यवस्थापनाने केलेली शेतकऱ्याची हत्याच आहे. त्यामुळे मृत माने यांच्या आत्महत्येस जबाबदार असलेल्या संबंधित कारखान्याच्या अध्यक्षांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी केली.
शेवगाव तालुक्यातील जोहरापूर येथील शेतकरी जनार्दन माने यांच्या उसाला तोड मिळत नसल्याने त्यांनी आत्महत्या केली. शुक्रवारी (ता.८) शेवगाव तहसील कार्यालयात तहसीलदार छगन वाघ यांनी प्रादेशिक साखर सहसंचालक, कारखाना प्रशासन, शेतकरी, संघटना यांच्या प्रतिनिधीची बैठक झाली. तहसीलदार छगन वाघ, प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाचे प्रतिनिधी व्ही. पी. सोनटक्के, यांच्यासह शेवगाव तालुक्यातील साखर कारखान्याचे प्रतिनिधी उपस्थित होते.
आत्महत्या केलेल्या माने यांच्या शेतातील उसाची ज्ञानेश्वर व गंगामाई या दोन्ही कारखान्यांकडे नोंद होती. पुरामुळे उसाचे नुकसानही झालेले होते. ऊसतोडणीसाठी वेळोवेळी चकरा मारूनही प्राधान्याने ऊसतोड देण्यात आली नाही. त्यामुळे हतबल झालेल्या माने यांनी ऊस पेटून देत आत्महत्या केली. त्यामुळे याची नैतिक जबाबदारी स्वीकारून कारखान्यांच्या अध्यक्षांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दत्ता फुंदे, बाळासाहेब फटांगडे, दादा टाकळकर, कम्युनिष्ट पक्षाचे ॲड. सुभाष लांडे, संजय नांगरे, संदीप बामदळे, आम आदमीचे शरद शिंदे यांनी आक्रमक भूमिका घेतली. शेतकऱ्यांच्या आत्महत्येसारखा गंभीर प्रकार घडूनही कोणीही कारखानदार व अधिकारी माने कुटुंबाच्या सांत्वनासाठी गेलेले नसल्याचा संताप व्यक्त केला.