मिरचीचा ठसका बसणार सर्वसामान्यांना; दरवाढ सुरूच
नुकतीच समोर आलेल्या आकडेवारीनुसार किरकोळ बाजारातील महागाईचा दर हा सलग दुसऱ्या महिन्या 6 टक्क्यांच्या पुढे आहे. याची झळ आता सर्वसामान्यांच्या खिशावर थेट पोहोचू लागली आहे. सध्या बाजारात हिरव्या मिरच्यांचे दर हे कमालीचे वाढले आहेत. मिरची महाग झाल्यामुळे गृहिणींचं बजेट कोलमडलंय. हिरव्या मिरच्यांचे दर हे तब्बल 150 रुपये किलोमपर्यंत पोहोचले आहेत. त्यामुळे नेहमीच्या जेवणात फोडणीसाठी आणि चवीला तिखटपणा आणण्यासाठी हमखास वापरली जाणारी मिर्ची आता लोकांच्या खिशाला झोंबू लागली आहे. किरकोळ बाजारात मूठभर मिरचीसाठी वीस ते तीस रुपयांपर्यंत रक्कम मोजावी लागतेय. 40 ते 50 रुपये इतका दर किरकोळ बाजारात हिरव्या मिरचीचा होता. मात्र आता हाच दर तब्बल 120 रुपयांपासून दीडशे रुपयांपर्यंत पोहोचला आहे. वातावरणातील बदल, जागतिक घडामोडी या सगळ्यामुळे मिरची महाग झाली असल्याचं सांगितलं जातंय.
कशामुळे दर वाढले?
अवकाळी पाऊस, दिवसेंदिवत वाढत असणारे पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीचे दर याचा थेट परिणाम आता भाज्यांच्या दरांवर होऊ लागलाय. इंधनाचे दर भडकल्यामुळे दळणवळण महागलंय. त्यामुळे याचा थेट फटका भाज्यांच्या दरांवर होताना पाहायला मिळतोय. कधी गारा, कधी अवकाळी पाऊस याचाही परिणाम भाज्यांच्या दरांवर होत असल्याचं दिसून आलंय.
जागतिक घडामोडींचे परिणामही बाजारावर दिसून येत आहेत. युक्रेन रशिया युद्धाचा परिणाम इंधनाच्या दरवाढी होतोय. त्यामुळे इंधनासोबत तेलाचे दरही कमालीचे वाढले आहेत. वाढत्या महागाईनं सर्वसामान्य बेजार झालेत. गृहिणींचं बजेट वाढत्या महागाईनं पुरतं कोलमडलंय. याबाबतच आता सर्वसामान्यांकडून सरकार लोकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
आणखी महागणार?
दरम्यान, येत्या काळात फक्त मिरचीच नाही, तर इतरही हिरव्या भाज्या, पालेभाज्या यांचे दर अधिक वाढतली, असाही अंदाज वर्तवला जातो आहे. किरकोळ महागाईनं गेल्या 8 महिन्यांच्या रेकॉर्ड तोडलाय. वाढत्या किंमतींनी सर्वसामान्यांचा खिसा फाडला असून समाजातील सर्वच स्तरांना महागाईची झळ बसू लागली आहे.
इतकी भाववाढ झाली..
धान्य – 3.95 %
मांसमच्छी – 7.54%
भाज्या – 6.13%
मसाले – 6.01%
फळं – 2.26%