बाजार समितीचे व्यापारी आणि अधिकारी इनकम टॅक्सच्या रडारवर
सेस चोरी रॅकेट होणार उघड 
शेतमालाच्या कमिशनवर व्यापार करणारे व्यापारी मोठे गुंतवणूकदार 
बोगस कोडच्या आधारे काही व्यापाऱ्यांनी APMC चा सेस बुडवला 
व्यापाऱ्यांकडून अनेक शेतकऱ्यांच्या शेतमालाची थकबाकी
पुणे पाठोपाठ मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती मधील व्यापारी आणि अधिकारी प्राप्तिकर विभागाच्या रडारवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
व्यापाऱ्यांची वार्षिक उलाढालीचे विवरण, नाव, परवाना क्रमांक, पॅन कार्ड, गाळा क्रमांक, भरलेले बाजार शुल्क आदी माहिती विहित नमुन्यात सादर करण्याचे आदेश पुणे बाजार समितीला दिले आहेत. त्याचबरोबर मुंबई बाजार समितीलाहि देणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांसह बाजार समिती प्रशासन आणि काही अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
बाजार समित्यांमध्ये शेतीमालाची आवक नोंद न करता, परस्पर शेतीमालाची विक्री करून, कोट्यवधी रुपयांचे बाजार शुल्क वाचविण्याचे गैरप्रकार वर्षानुवर्षे बाजार समित्यांमध्ये सुरू आहेत. शिवाय मुंबई APMC भाजीपाला मार्केटमधील बोगस कोडचा वापर करून करोडो रुपये सेस बुडवण्यात आला आहे. याची तक्रार लाचलुचपत विभागाकडे संचालक प्रभू पाटील यांनी केली आहे. तर या काही प्रकारांची कुणकुण प्राप्तिकर विभागाला लागली आहे.
त्यामुळे व्यापाऱ्यांनी वर्षभरात विक्री केलेला शेतीमाल आणि त्यांच्या विविध बँक खात्यांद्वारे झालेले व्यवहार आणि प्रत्यक्ष भरण्यात आलेले बाजार शुल्क यामध्ये प्रचंड तफावत असल्याची चर्चा असते. यामध्ये बाजार समिती प्रशासनदेखील सहभागी असल्याची चर्चा आहे. या अनुषंगाने प्राप्तिकर विभागाने विहित नमुन्यात मागविलेल्या माहितीमुळे व्यापाऱ्यांसह बाजार समिती आणि काही अधिकारीदेखील प्राप्तिकर विभागाच्या रडारवर असल्याची चर्चा आहे.
मुंबई एपीएमसी भाजीपाला आणि फळ मार्केटमध्ये जवळपास २५०० हजार व्यापारी आहेत. १० ते १५ टक्के शेतमाल कमिशन आधारावर विकून अनेक व्यापारी करोडपती झाल्याचे निदर्शनास आले आहे. या ठिकाणीच ५० टक्के व्यापारी बांधकामासह विविध व्यवसायात भागीदार आणि गुंतवणूकदार आहेत. त्याचबरोबर बाजार समितीचे अनेक अधिकारी आणि कर्मचारी सुद्धा याच्याशी संबंधित आहेत. त्यामुळे सूत्रांनी सांगितल्यानुसार इनकम टॅक्स लवकरच यांच्यावर धाडी टाकण्याच्या तयारीत आहेत. इनकम टॅक्स विभागाने पाठविलेल्या पत्रानुसार बाजार समिती प्रशासनाने प्रत्येक व्यापाऱ्याला नोटीस काढून, विहित नमुन्यात माहिती सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
सेस चोरी रॅकेट होणार उघड
बाजार आवारातील प्रत्यक्ष होणारी आवक आणि नोंद यामध्ये मोठी तफावत असल्याचे शेरे लेखापरीक्षण अहवालात आहेत. मात्र यावर कोणतीही कार्यवाही बाजार समिती प्रशासन आणि पणन संचालकांकडुन होत नसल्याचे वास्तव आहे. प्रत्यक्ष आवक आणि नोंदीतील फेरफारीद्वारे अधिकारी आणि व्यापारी यांच्यातील आर्थिक तडजोडीची मोठी चर्चा बाजारात आहे. बोगस कोडचा वापर करून काही व्यापारी आणि अधिकाऱ्यांच्या संगनमताने बाजार समितीचा कोट्यवधी रुपयांचा सेस बुडवण्यात आला आहे.
तर दोन दिवसांपूर्वी मुंबई भाजीपाला मार्केट उपसचिवांकडे मापाडी यांच्या सांगण्यानुसार व्यापारी आवक देत नसल्याची तक्रार करण्यात आली आहे. तर व्यापारी आवक देत नसल्याच्या छोटया-मोठ्या तक्रारी वर्षभर सुरु असतात. तर हि आवक योग्य आल्यास त्यातून मापाडींना पगार आणि बाजार समितीला सेस भेटतो. भाजीपाला मार्केटमध्ये विविध व्यापार होऊन सुद्धा व्यापारी आवक देत नाहीत, योग्य तो सेस भरत नाहीत, शेतकऱ्यांच्या मालाची थकबाकी ठेवत आहेत अशा विविध घटना व्यापारी करतात. याच आधारे अनेक व्यापारी मोठमोठ्या घर आणि गाड्यांचे मालक आहेत ते कसे असा प्रश्न इनकम टॅक्स विभागाला पडल्याचे सांगण्यात येत आहे.