‘आम्ही संचालकांची माणसं, आमचे कोण वाकडं करणार’?
बाजार समितीच्या नोटिसनंतरही भाजीपाला मार्केटमध्ये कांदा, बटाटा आणि लसणाचा व्यापार सुरुच!
कांदा बटाटा मार्केट संचालकांच्या भूमिकेला भाजीपाला मार्केट संचालकांचे आव्हान
मुंबई एपीएमसी कांदा बटाटा मार्केट संचालक अशोक वाळुंज यांनी कांदा-बटाटा व्यापाऱ्यांसह अचानकपणे भाजीपाला मार्केटमध्ये पाहणी दौरा केला होता. दरम्यान मार्केट परिसरात प्रत्येक विंग मध्ये अनधिकृतपणे कांदा,बटाटा आणि लसणाचा व्यापार सुरू होता. या पाहणी दौऱ्या दरम्यान मार्केट उपसचिव तसेच सुरक्षा कर्मचारी उपस्थित होते.
व्यापाऱ्यांवर कारवाईची मागणी करून त्यांची संपूर्ण माहिती देण्याचे पत्र संचालकांनी सचिवाला दिले होते. तसेच सचिव संदिप देशमुख यांनी देखील भाजीपाला बाजारात येणाऱ्या कांदा-बटाटा आवकवर बंदीचे आदेश दिले होते. मात्र या सगळ्या प्रकरणाला फाटा देत भाजीपाला मार्केटमध्ये व्यापार सुरूच आहे. शिवाय मार्केटमध्ये कांदा, बटाटा आणि लसणाची आवक  देखील सुरू झाली आहे.
आमदार शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या दालनात अनधिकृत व्यपार बंद करण्यासाठी बैठक झाली होती. या बैठकीत कांदा बटाटा, भाजीपाला, फळ मार्केटच्या संचालक देखील उपस्थित होते. तरी देखील बाजार समितीमध्ये अनधिकृत व्यापार सुरु असल्याने संचालक निष्क्रिय ठरत असून पुन्हा प्रशासक आणण्याची मागणी बाजार घटक करत आहेत.