शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आणि बाजार समित्यांना पूर्वीसारखे वैभव प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न करणार:बाळासाहेब नाहाटा
महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी महासंघावर सभापतीपदी NCP चे बाळासाहेब नाहाटा तर उपसभापतीपदी शिवसेनेचे संतोष सोमवंशी
महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघाच्या सभापतीपदी श्रीगोंदा येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रविणकुमार उर्फ बाळासाहेब नाहाटा, तर उपसभापतीपदी लातूर येथील शिवसेनेचे संतोष सोमवंशी यांची बिनविरोध निवड झाली. २०२२ ते २०२७ या पाच वर्षांच्या कालावधीसाठी ही निवड असणार आहे. तत्कालिन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी पहिले अध्यक्षपद भूषविलेल्या आणि राज्यातील ३०१ बाजार समित्यांची शिखर संस्था असलेल्या सहकारी संघाची निवड प्रक्रिया मंगळवारी पार पडली. मार्केटयार्ड येथील सहकारी संघाच्या मुख्यालयात झालेल्या या बैठकीला २१ पैकी १९ संचालक उपस्थित होते.
निवडणूक अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक नारायण आघाव, तर निवडणूक निरीक्षक म्हणून मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष अशोकराव डख यांनी काम पाहिले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील आदी नेत्यांच्या मार्गदर्शनात ही निवड प्रक्रिया पार पडली.
नवनिर्वाचित संचालक मंडळात मनीष दळवी (भाजप, मुंबई-रत्नागिरी-सिंधुदुर्ग), केशव मानकर (भाजप, भंडारा-गोंदिया), दामोदर नवपुते (भाजप, औरंगाबाद-जालना), पोपटराव सोनावणे (राष्ट्रवादी, जळगाव-नंदुरबार-धुळे), रमेश शिंदे (राष्ट्रवादी, पुणे-सातारा), अशोकराव डक (राष्ट्रवादी, बीड-उस्मानाबाद), संजय कामनापुरे (राष्ट्रवादी, नागपूर-वर्धा), संदीप काळे (राष्ट्रवादी, राखीव), रंजना कांडेलकर (राष्ट्रवादी, राखीव), पंढरीनाथ थोरे (राष्ट्रवादी, राखीव), यशवंतराव जगताप (काँग्रेस, सोलापूर-सांगली-कोल्हापूर), आनंदराव जगताप (काँग्रेस, यवतमाळ), दिनेश चोखारे (काँग्रेस, चंद्रपूर-गडचिरोली), बाबाराव पाटील (काँग्रेस, राखीव), इंदुताई गुळवे (काँग्रेस, महिला राखीव), अंकुश आहेर (शिवसेना, परभणी-हिंगोली), सेवकराम ताथोड (शिवसेना, अकोला-बुलढाणा), ज्ञानेश्वर नागमोते (शिवसेना, अमरावती-वाशीम) यांचा समावेश आहे.
आदरणीय वसंतदादा पाटील यांनी बाजार समिती संघाची स्थापना केली. त्यांनी भूषविलेल्या पदावर बसण्याची संधी मला मिळाली, हे भाग्य आहे. शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आणि बाजार समित्यांना पूर्वीसारखे वैभव प्राप्त करून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. कोरोना, तसेच केंद्र सरकारने आणलेली नवी धोरणे यामुळे शेतकरी, बाजार समित्यांपुढे काही आव्हाने आहेत. विभागवार प्रश्न समजून घेत त्यावर काम करण्याचा आमचा प्रयत्न आहे. ३०१ बाजार समित्यांना विश्वासात घेऊन शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही यापुढे काम करू. बाळासाहेब नाहाटा (सभापती, महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी महासंघ)