नाफेडतर्फे 3 लाख मेट्रिक टन कांदा खरेदीचा शुभारंभ
 
नाशिक: शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळाला पाहिजे असे सरकारचे धोरण आहे. म्हणून नाफेडने बाजार समितीमध्ये होत असलेल्या लिलावात प्रत्यक्ष सहभागी व्हावे, त्यामुळे स्पर्धा वाढेल व शेतकऱ्यांना योग्य भाव मिळून शेतकऱ्यांचा फायदा होईल, असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी उमराणे येथे नाफेडतर्फे करण्यात येणाऱ्या 3 लाख मेट्रिक टन कांदा खरेदीच्या शुभारंभाप्रसंगी केले...
शिवप्रसाद लॉन्सच्या आवारात डॉ. भारती पवार यांच्या हस्ते व भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष सुरेश निकम यांच्या अध्यक्षतेखाली शुभारंभ झाला. याप्रसंगी माजी पंचायत समिती उपसभापती धर्मा देवरे, माजी सरपंच बाळासाहेब देवरे यांनी शेतकऱ्यांच्या कांद्याच्या भावाबद्दल व पेमेंटबद्दल अडचणी मांडल्या. डॉ. पवार यांनी तात्काळ सूचना केल्या आणि या सूचनेनुसार आज कांद्याला १ हजार १५६ रुपये क्विंटल भाव मिळाला.
यावेळी डॉ. भारती पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री पियुष गोयल व तोमर यांचे आभार मानले. 2020 मध्ये 87 हजार मेट्रिक टन, 2021 मध्ये एक लाख 85 हजार मॅट्रिक टन, 2022 मध्ये 2 लाख 38 हजार मॅट्रिक टन कांदा नाफेडने खरेदी केला.
यावर्षी कांद्याचे उत्पादन जास्त झाल्याने तीन लाख मीटर कांदा खरेदी केला जाणार असल्याचे केंद्रीय मंत्री पवार यांनी जाहीर केले. तसेच कांद्याची कोणत्याही प्रकारची निर्यात बंदी झालेली नसून बांगलादेश, पाकिस्तान, श्रीलंका यांची आर्थिक परिस्थिती खराब झाल्याने या देशांनी आयात बंदी केली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कोणत्याही प्रकारचे राजकारण न करता शेतकऱ्यांचे प्रश्न कसे सुटतील यावर राजकारण्यांनी विचार करावा असे त्यांनी यावेळी सांगितले.
प्रास्ताविक भूषण निकम यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेश निकम, उमराणे कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती प्रशांत देवरे, अरुण माऊली पाटील, नाफेडचे अधिकारी पंकज कुमार, निखिल फडादे, एनसीसीएफचे जोसेफ, एम. एम. परिक्षीत यांची भाषणे झाली.
कार्यक्रमास व्यापारी असोसिएशन जिल्हाध्यक्ष खंडू पंडित देवरे, माजी सभापती रतन देवरे, माजी सरपंच प्रकाश ओस्तवाल, माजी सभापती राजेंद्र देवरे, व्यापारी संचालक सुनील देवरे, माजी सरपंच दिलीप देवरे, दत्तू देवरे बाळासाहेब देवरे, माजी सभापती डॉ. आत्माराम कुंभार्डे, पंकज ओस्तवाल आदी उपस्थित होते. आबा देवरे यांनी आभार मानले.