Agriculture Electricity : मुख्यमंत्री सौरकृषी योजना-२ साठी ३० हजार कोटींची गुंतवणूक
 
Agriculture Electricity : मुख्यमंत्री सौरकृषी योजना-२ साठी ३० हजार कोटींची गुंतवणूक
-शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा वीज मिळावी, यासाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी योजना-२ योजना जाहीर केली आहे.
नाशिक : शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा वीज मिळावी, यासाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी योजना-२ योजना (Agriculture Solar Scheme) जाहीर केली आहे. या योजनेसाठी सरकारने २८ हजार एकर जमीन भाडेतत्वावर घेण्याचा निर्णय घेतला आहे.यायोजनेची अंमलबजावणी २०२५ च्या अखेरपर्यंत होणार असून सौरऊर्जा निर्मितीसाठी महाराष्ट्रात ३० हजार कोटींची गुंतवणूक केली जाईल.त्यातून ग्रामीण भागात हजारो रोजगार उपलब्ध होणार असल्याची माहिती महावितरण होल्डिंग कंपनीचे स्वतंत्र संचालक विश्वास पाठक यांनी दिली.या योजनेत आता शेतकऱ्यांकडून भाडेतत्वावर घेतल्या जाणाऱ्या समिनींसाठी प्रतिएकर ५० हजार रुपये व हेक्टरी १ लाख २५ हजार रुपये भाडे दिले जाणार आहे. तसेच हा भाडेपट्टा २५ वर्षांसाठी राहणार आहे.या योजनेसाठी सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी महावितरणच्या सध्याच्या वीज उपकेंद्राच्या लगत पाच किलोमीटर परिघातील जमीन शेतकऱ्यांकडून घेतली जाणार आहे.
तसेच ही जमीन सरकारी मालकीची असल्यास त्यासाठी दहा किलोमीटर परिघातील जमीनीवरही सौरऊर्जा प्रकल्प उभारता येणार आहे. सरकारी जमिनीसाठी नामपात्र एक रुपया भाडे दिले जाणार आहे, अशी माहिती पाठक यांनी दिली.सरकारी जमीन उपलब्ध नसल्यास शेतकऱ्यांना आवाहन केले जाणार असून शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी महावितरणच्या पोर्टलवर यासाठी नोंदणी करावी लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अशी आहे योजना
प्रकल्पासाठी जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांना हेक्टरी वार्षिक १ लाख रुपये भाडे मिळणार.
जमीन २५ वर्षांसाठी भाडेपट्ट्याने द्यावी लागणार
वार्षिक भाडेपट्ट्यात दरवर्षी तीन टक्के वाढ केली जाणार.
जमीन सध्याच्या विद्युत उपकेद्रापासून पाच किलोमीटरच्या आत असणे बंधनकारक
सौरऊर्जा प्रकल्प असणाऱ्या ग्रामपंचायतींना एका प्रकल्पामागे पाच लाख रुपये निधी दिला जाणार
योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांना महावितरणच्या पोर्टलवर नोंदणी करावी लागणार