Cotton Market: बाजारपेठांत कापूस दरात सुधारणा
जिल्ह्यातील मानवत, सेलू, परभणी या कापसाच्या प्रमुख बाजारपेठांमधील कापसाची आवक कमी झाली आहे. लिलावाद्वारे होणाऱ्या कापूस खरेदी दरात सुधारणा झाली. मागील दोन दिवसांत कापसाच्या दरात क्विंटलमागे १५० ते ४५० रुपयांनी सुधारणा झाली आहे.
सोमवारी (ता. ३) मानवत बाजार समितीत कापसाच्या ११० ते १२० गाडी आवक होती. कापसाला प्रतिक्विंटल किमान ६००० ते कमाल ७४१५ रुपये तर सरासरी ७३०० रुपये दर मिळाले. सेलू बाजार समितीमध्ये कापसाला प्रतिक्विंटल किमान ६२५० ते कमाल ७४१० रुपये तर सरासरी ७३५० रुपये दर मिळाले. परभणी बाजार समितीत कापसाला प्रतिक्विंटल किमान ७००० ते कमाल ७४३५ रुपये तर सरासरी ७४०० रुपये दर मिळाले.
मानवत बाजार समितीमध्ये शनिवारी (ता. १) कापसाची २३०० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ६००० ते कमाल ७३७५ रुपये तर सरासरी ७२५० रुपये दर मिळाले. शुक्रवारी
(ता. ३०) कापसाची १६०० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ६००० ते कमाल ७१९० रुपये तर सरासरी ७१०० रुपये दर मिळाले. बुधावारी (ता. २८) ६०० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ६००० ते कमाल ६९५० रुपये तर सरासरी ६८२५ रुपये दर मिळाले.
गेल्या आठवड्याच्या तुलनेत मानवत बाजार समितीत कापसाची आवक कमी झाली. दरात चढउतार सुरूच आहे. किमान दर ६००० रुपयांवर स्थिर आहेत. कमाल दरात १५० ते ४०० रुपयांनी सुधारणा झाली. सेलू बाजार समितीत शनिवारी (ता. १) कापसाची १६८९ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ६४०५ ते कमाल ७३१० रुपये तर सरासरी ७२६० रुपये दर मिळाले.
किमान आठ हजार रुपये दराची अपेक्षा
परभणीतील बाजारपेठांत गेल्या काही आठवड्यांपासून कापसाचे कमाल दर साडेसात हजार रुपयांच्या आतच आहेत. किंचित सुधारणा झाल्यास आवक वाढते. आवक वाढल्यानंतर दर कमी होत आहेत.
आवक कमी झाल्यानंतर परत दरात थोडी सुधारणा होते, असे आजवरचे चित्र आहे. किमान आठ हजार रुपये दर मिळतील या अपेक्षेने अजूनही अनेक शेतकऱ्यांनी कापूस विक्री केलेली नाही. बाजारभावातील सुधारणा टिकून राहत नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.