हातसडीच्या तांदळाचे महत्त्व माहीत आहे का?, प्रक्रिया केलेल्या तांदळातून निघून जातात हे जीवनसत्व
मीलवर प्रक्रिया न केलेले किंवा पॉलीश न केलेले आणि हाताने सडलेले तांदूळ म्हणजे हातसडीचे तांदूळ. यातून आपल्याला प्रथिने, लोह आणि फायबर मिळतात. सुदृढ आरोग्यासोबत मधुमेह नियंत्रणासाठीही हे तांदूळ उपयोगी आहेत. हातसडीच्या तांदळांच्या मागणीत वाढ झाली आहे. कुरखेडा तालुक्यातील गुरनोली येथील ओमकार महिला बचत गटाच्या महिलांनी हातसडीच्या तांदळासाठी पुढाकार घेतला. हा नावीन्यपूर्ण प्रकल्प उभा केला आहे. यामधून मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी त्यांना उपलब्ध झालेली आहे.
जीवनात शरीराला आवश्यक पोषण तत्त्वांची गरज असते. अशात हातसळीच्या तांदळाचा उपयोग यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतो. अशी संकल्पना सुचल्याने त्यांनी हा प्रयोग सुरू केला. त्यांच्या उत्पादनाला बऱ्यापैकी मागणी येऊ लागली आहे.
मिलिंगच्या तांदळात पोषकतत्व कमी
हातसडीच्या तांदळावरचे संपूर्ण आवरण मशीनने काढले जात नाही. त्यामुळे त्यांच्यातील व्हिटॅमिन्स आणि खनिज टिकून राहतात. मशीनमधून निघालेला तांदूळ चकाकतो. पण, पोषक तत्वे कमी होत जातात. यामुळे हातसडीच्या तांदळाला अधिक मागणी वाढत आहे.
हल्ली यंत्राच्या साह्याने भाताच्या दाण्यांवरील साल/टरफल काढून त्याला पॉलिश केले जाते. यामुळे तांदूळ आणि कोंढा यांच्यामध्यात असलेले प्रथिने, लोह, फायबर, क जीवनसत्त्व यांच्यासह अनेक पौष्टिक घटक नष्ट होतात. पण तांदळाला मात्र चांगलीच शुभ्रता येते.
हातसडीचे तांदुळ आरोग्यदायी
पॉलीशच्या तांदळाची किमतही हातसडीच्या तांदळापेक्षा कमी असते. यामुळे सर्वसामान्य माणूस पांढऱ्या तांदळाचा अधिक प्रमाणात वापर करीत असल्याचे दिसून येते. असे असले तरी मशीनच्या तांदळापेक्षा हातसडीचा तांदूळ आरोग्यदायी असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
हातसडीचा तांदूळ यंत्रसडीच्या तांदळाच्या तुलनेत किमतीने थोडा महाग असतो. याचे कारणही तसेच आहे. यातील पौष्टिक तत्वे कायम राहतात. ती आरोग्यासाठी फायद्याचे ठरतात. यामुळे या तांदळाची किंमत अधिक असते.
कोणत्या तांदळाला अधिक मागणी असते
जिल्ह्यात साधारणतः पांढऱ्या तांदळाला अधिक मागणी असते. पांढरा तांदूळ किमतीला कमी असल्याने सर्वसाधारण लोकांच्या आवाक्यात असतो. ग्रामीण भागात मोलमजुरी करणारे लोक अधिक प्रमाणात असतात. भलेही यात पौष्टिक तत्वे कमी असतात. पण किमतीने परवडत असल्याने याची मागणी अधिक आहे.
प्रक्रिया केल्याने प्रथिने, लोह, फायबर निघून जातात
तांदळाच्या कोंड्यात व्हिटॅमिन बी ६ असते. पॉलीश केलेल्या तांदळात ते राहात नाही. तांदळावर यंत्राद्वारे बऱ्याच प्रक्रिया केल्याने टरफल आणि दाण्यांवरील असलेली पौष्टिक तत्वे नष्ट होतात. गुरनोली येथील या महिला बचत गटांच्या प्रकल्पाला शासकीय स्तरावरून प्रोत्साहन आणि आर्थिक मदत उपलब्ध झाली. अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ओमकार महिला बचत गटाच्या अध्यक्ष वृंदाताई खुणे मार्गदर्शन करतात.