द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना बेदाण्यांनी तारले; प्रतिकिलोला ३११ रुपये दर
गेल्या दोन महिन्यांपासून सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती ही चर्चेत आहे ती, कांद्याची विक्रमी आवक आणि विक्रमी दर. यामुळे बाजार समितीची तुलना थेट अशिया खंडातील कांद्याच्या सर्वात मोठ्या कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगावशी करण्यात आली आहे. आता कांद्याची आवक कमी झाली असली तर बेदाण्याची आवक आणि विक्रमी दर हे दोन्ही प्रकार येथील बाजार समितीमध्ये पाहवयास मिळत आहेत. सध्या द्राक्ष तोडणी अंतिम टप्यात आहे असे असताना सोलापूर बाजार समितीमध्ये बेदाण्याचा पहिलाच सौदा गुरुवारी झाला असून 311 रुपये प्रतिकिलो असा दर मिळाला आहे. तर सौद्याच्या पहिल्याच दिवशी बेदाण्याची 40 टनाची आवक झाली आहे. विशेष म्हणजे ही सर्व आवक स्थानिक भागातून झाली आहे. त्यामुळे द्राक्ष उत्पादनात होणारी घट ही बेदाण्यातून भरुन निघणार का हे पहावे लागणार आहे. पहिल्याच सौद्यासाठी नाशिक, सांगली या भागातील व्यापारी उपस्थित होते.
निसर्गाच्या लहरीपणामुळे द्राक्ष बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. उत्पादनात मोठी घट झाली असून यंदा दरवाढ आणि बेदाण्यातून उत्पादन या बाबींवरच भर दिला जाणार आहे. मध्यंतरी थंडीमुळे द्राक्ष हे तडकत होते तर त्यापासून बेदाणा निर्मिती पोषक वातावरणही नव्हते. त्यामुळे यंदा महिन्याने द्राक्ष हंगाम लांबणीवर पडणार आहे. मात्र, आता पोषक वातावरण झाले आहे. त्यामुळे सांगली, तासगाव, पंढरपूर आणि नाशिक येथून बेदाण्याची आवक सुरु झाली आहे.
निसर्गाच्या लहरीपणामुळे द्राक्ष उत्पादनावर तर परिणाम झालाच आहे. पण शेतकऱ्यांचा अधिकचा खर्च झाला आहे. द्राक्ष घड भरत असतानाच सुरु झालेले संकट द्राक्ष विक्रीपर्यंत कायम होते. शिवाय मंध्यंतरी थंडी वाढल्याने तोडणीला आलेल्या द्राक्षांना तडे गेले होते. अशा अवस्थेतही आता निर्यात सुरु झाली आहे. तर दुसरीकडे बेदाणा निर्मितीमध्येही वाढ होत आहे. सोलापूरमध्ये 40 टन बेदाण्याची आवक झाली असून ते ही स्थानिक बाजारपेठेतून. त्यामुळे बेदाणा निर्मिती वाढलेली आहे. वाढलेल्या आवकबरोबर शेतकऱ्यांच्या उत्पादनातही वाढ होणार आहे.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जिल्ह्यातील बार्शी, पंढरपूर, दक्षिण सोलापूरमध्ये बेदाण्याची निर्मिती मोठ्या प्रमाणात होते. शिवाय आता तापमानात वाढ झाल्याने ही प्रक्रिया वाढलेली आहे. यापूर्वी शेतकऱ्यांना बेदाणा विक्रीसाठी सांगली, तासगाव ही बाजारपेठ जवळ करावी लागत होती. पण आता सोलापूर येथे दर गुरुवारी बेदाणा सौदे होणार असल्याने येथील दराचा लाभ घेण्याचे अवाहन बाजार समिती सभापती तथा आमदार विजयकुमार देशमुख यांनी केले आहे.