Iffco Kisan Drone : नॅनो खतांच्या फवारणीसाठी इफको करणार 2500 किसान ड्रोनची खरेदी
Agriculture Drone Scheme : देशभरात नॅनो युरिया आणि नॅनो डीएपी खतांच्या अधिक सुलभपणे फवारणीसाठी इफकोने २५०० किसान ड्रोन खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. देशात नॅनो खतांच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी इफको या ड्रोनची खरेदी करणार आहे.
शेतीच्या वापरासाठी लागणाऱ्या ड्रोनची किंमत जवळपास ६ ते १० लाखांच्या आसपास आहे. एका ड्रोनच्या किमतीमध्ये शेतकरी एक ट्रॅक्टर खरेदी करू शकतो. यामुळे शेतकऱ्यांना वैयक्तिक ड्रोन खरेदी करणे परवडणारे नाही. पारंपरिक ऐवजी शेतकऱ्यांनी नॅनो खतांचा वापर वाढवावा, यासाठी सरकार प्रयत्न करत आहे.
यासाठीच इंडियन फार्मर्स फर्टिलाइजर को आपरेटिव लिमिटेड म्हणजेच इफको अडीच हजार किसान ड्रोनची खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. नॅनो युरिया आणि नॅनो डीएपी ही द्रवरूप ही खते इफकोने विकसित केली आहेत.
दरम्यान, इफकोने अडीच हजार ड्रोन खरेदीसाठी एका व्यापक राष्ट्रीय अभियानाची सुरूवात केली आहे. जे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'सहकारापासून समृध्दी' या उद्दिष्टाने प्रेरित आहे.
जगातील क्रमांक एकची सहकारी संस्था असा इफकोचा नावलौकीक आहे. इफकोच्या ड्रोन खरेदी अभियानामुळे जवळपास ५००० हजार ग्रामीण उद्योजकांचा विकास होणार आहे. इफकोकडून त्यांना ड्रोन फवारणीचे प्रशिक्षणही देण्यात येणार आहे.
इलेक्ट्रिक थ्री व्हीलरही खरेदी करणार
इफकोचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. यु. एस. अवस्थी यांनी ड्रोन खरेदी संदर्भात एक ट्विट केले आहे. 'इफको किसान ड्रोन' अभियानाच्या माध्यमातून 'कृषी ड्रोन'मध्ये प्रवेश केला आहे.
नॅनो युरियाच्या फवारणीसाठी शेतकऱ्यांना हे उपयुक्त ठरेल. तसेच इफको केवळ ड्रोनचीच खरेदी करणआर नाही, तर शेतामध्ये ड्रोन घेवून जाण्यासाठी २५०० इलेक्ट्रिक थ्री व्हीलरचीही खरेदी करणार आहे.
दरम्यान, आतापर्यंत इफकोद्वारा विकसित नॅनो युरियाच्या पाच कोटीहून अधिक बाटल्यांची विक्री झाली आहे. नॅनो युरियाच्या एका बाटलीमध्ये ५०० मिली द्रावण असते, जे ४५ किलोच्या युरियाच्या पोत्याच्या बरोबर आहे. ड्रोनद्वारे नॅनो खतांची एका दिवसात जवळपास २० एकर क्षेत्रावर फवारणी करण्याची क्षमता आहे.