मुंबई APMC भाजीपाला मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात चिनी भाजी विक्री; मात्र आवक नाही सेस नाही
मुंबई APMC भाजीपाला मार्केटमध्ये गेली काही दिवसांपासून चिनी भाजीपाला मोठ्या प्रमाणात येत आहे. परंतू या भाज्यांचे दर साधारण भाज्यांपेक्षा चार ते पाचपटीने अधिक दराने विक्री केली जात आहे. प्रत्येक्षात मात्र शेतकऱ्याला केवळ २५ ते ३० रुपये किलोचा दर दिला जातो. विशेष म्हणजे या भाजीपाल्याचा साधा भाजीपाला म्हणून बाजार समितीमध्ये नोंद केली जात आहे. त्यामुळे या चिनी भाजीपाल्यावरील लाखो रुपये सेस बुडत असल्याचे दिसत आहे.
या भाज्या थर्मोकोल बॉक्समध्ये येत असून बाजार आवारात D आणि C पाकळीमध्ये या भाज्यांचा मोठ्या प्रमाणात व्यापार केला जातो.   मात्र, याची नोंद बाजार समिती दप्तरी होत नसल्याने हे सुरु असलेले व्यवसाय कोणाच्या आशीर्वादाने सुरु आहेत अशी चर्चा बाजार आवारात सुरु आहे. बाजार समितीकडे संबंधित मालाचे दर मागितले असता अशा कोणत्याही मालाची नोंद बाजार समितीमध्ये नाही. तर इतर भाज्यांच्यामध्ये हे बॉक्स येत असल्याने याबाबत माहिती मिळत नसल्याचे उपसचिव मारुती पवितवार यांनी सांगितले. तसेच या पुढे या मालाची तपासणी करून योग्य ती कारवाई केली जाईल असे त्यांनी सांगितले.
मुंबई बाजार समितीमध्ये या प्रकारचा जवळपास चार टन माल विक्रीसाठी येतो. सध्या आपल्या देशी भाज्यांना १० ते २० रुपये प्रतिकिलो दर मिळतो, तर या चिनी भाज्यांना मात्र अधिक दर मिळतो. चेरी टोमॅटो ८० रुपये किलो, रंगीत ढोबळी मिरची ८० रुपये, हिरवा कोबी ५० रुपये, जांभळा किंवा लाल कोबी ६० रुपये, आईस बुर्ग प्रक्रारातील कोबी- ४० रुपये, ब्रोकोली २० रुपये व सॅलरी ३० रुपये प्रतिकिलो या दराने हा भाजीपाला विकला जात आहे.