माथाडी कामगार आणि व्यापाऱ्यांच्या वादात शेतकऱ्याला नुकसान; तर दोघांच्या भूमिका योग्य
मुंबई APMC कांदा-बटाटा मार्केटमध्ये व्यापारी आणि माथाडी कामगार वाद आज पुन्हा उफाळून आला. गेली दोन वर्षांपासून माथाडी कामगार ५० किलोपेक्षा अधिक वजनाच्या गोणीचा माल व्यापाऱ्यांनी मागवू नये याबाबत मागणी करत आहेत. तरी अधिक वजनाचा माल आल्याने माथाडी आक्रमक झाले. तर शेतकरी ५० किलोपेक्षा अधिक वजनाचा माल पाठवतात त्यात व्यापाऱ्यांचा दोष नसल्याचे व्यापारी सांगत आहेत. त्यामुळे सोमवार पर्यंत या प्रश्नावर तोडगा ना निघाल्यास आम्ही व्यापार बंद करू असा इशारा व्यापाऱ्यांनी दिला आहे. याबाबत सभापती अशोक डक यांची भेट घेऊन व्यापाऱ्यांनी लेखी पत्र दिले. तर व्यापार बंद करून मार्ग निघणार नसल्याचे सांगत मार्केट कमिटी यावर योग्य तोडगा काढणार असल्याचे सभापती अशोक डक म्हणाले.
तर राज्य सरकारने ५० किलो वजनाच्या गोणी भरल्या जाव्यात असे परिपत्रक काढले असताना काही व्यापारी अधिक वजनाच्या गोणी मागवतात असा आरोप माथाडी कामगार करत आहेत. त्यामुळे गेली काही वर्षांपासून सुरु असलेला वाद आज पुन्हा उफाळून आला. कांदा-बटाटा मार्केटमध्ये जवळपास १७० गाडी आवक झाली असून त्यातील ४० ते ५० गाडी कांदा गाड्यांमध्ये असाच पडून राहिला आहे.   परिणामी व्यापारी आणि माथाडी कामगारच्या वादामध्ये शेतकऱ्याला मोठा फटका बसणार असल्याचे दिसत आहे.
सकाळपासूनच आलेला माल खाली न झाल्याने हजारो टन माल गाड्यांमध्ये असाच पडून राहिला. तर सातत्याने माथाडी आणि व्यापारी वाद उफाळून येत असल्याने दोन्ही घटकांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली. शासनाच्या जीआरनुसार ५० किलो वजनाचा गोणी अपेक्षित असताना काही व्यपाऱ्यांकडे ५५ किलो वजनाचा माल येत आहे. गेली दोन वर्षपासून संबंधित घटकांशी वारंवार बैठक घेऊन देखील शासन निर्णयाची अंमलबजावणी केली जात नसल्याचे माथाडी कामगारांनी सांगितले. तसेच ५० किलोपेक्षा अधिक वजनाची गोणी खाली उचलणार नसल्याचा अंतिम इशारा दिला.
नियमित एकाच मुद्यावर वाद होत असल्याने आम्ही कंटाळालो आहे. ५० किलोच्या निर्बंधांमुळे शेतकऱ्यांनी मुंबई APMC कडे पाठ फिरवली असल्याचे व्यापारी म्हणाले. अनेक बाजार समित्यांमध्ये तसेच भाजीपाला आणि मार्केटबाहेर ५० किलोपेक्षा अधिक वजनाचा माल खाली केला जातो. मग मुंबई बाजार समितीमध्येच हि अडवणूक का? असा सवाल व्यापारी करत आहेत. तर मुंबई APMC व्यापाऱ्यांवर अन्याय करत आहे. शिवाय यात शेतकरी आणि दोन्ही बाजार घटकांचे मोठे नुकसान होत आहे. तर जाणीवपूर्वक आम्हाला लक्ष केले जात असल्याचे व्यापारी म्हणाले. शिवाय त्यामुळे होणाऱ्या नुकसानीला जबाबदार कोण? असा सवाल त्यांनी विचारला आहे.
मुंबई APMC मार्केटमध्ये राज्यासह राज्यबाहेरील कांदा, बटाटा मार्केटमध्ये येतो. जवळपास ९५ टक्के माल हा ५० किलोत येत आहे. मात्र शेतकरी शेतमाल भरत असताना त्याच्याकडे वजन काटा नसल्याने त्यांनी माल भरलेली गोण ५० किलोपेक्षा अधिक होते. इतर सर्व बाजारपेठांमध्ये माथाडी कामगार या मालाची चढउतार करतात. फक्त मुंबईच्या कामगारांनी सांगितले कि आम्ही या मालाची चढउतार करणार नाही. राजू मणियार कांदा-बटाटा व्यापारी
मुंबई APMC मार्केटला माल येत असलेल्या सर्व मार्केटला भेटी देऊन संबंधित विषयाचे पत्रक दिले आहे. तरी अधिक वजनाचा माल येतो आणि तो कामगार खाली करत नसल्याने आम्ही सोमवार पासून व्यापार बंदचा निर्णय घेतल्याचा व्यापारी संजय पिंगळे यांनी सांगितले.
केंद्र शासनाने केलेल्या नियमानूसार ५० किलो वजनाचा नियम लागू करण्यात आला आहे. राज्यभर याबाबत बाजार समित्यांना सूचित करण्यात आले आहे. तरी काही व्यापारी अधिक वजनाचा माल मागवत त्यामुळे कामगारांमध्ये असंतोष आहे. तर काही ठिकाणी अधिक वजनाचा माल खाली होत असेल तर येथील व्यवसायावर परिणाम होण्याची शक्यता हि व्यापाऱ्यांची बरोबर आहे.   त्यामुळे राज्य सरकारने सरसकट हा नियम लागू केला पाहिजे आणि तो विषय अधिवेशनाच्या काळात मांडणार असल्याचे आमदार शशिकांत शिंदे यांनी सांगितले.