मॅग्नेट प्रकल्प ठरेल शेतकऱ्यांचा गेम चेंजर – मूल्यवर्धनातून शेतमाल जागतिक बाजारपेठेत
.jpeg)
पुणे: “शेतमालाचे मूल्यवर्धन करून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी मॅग्नेट प्रकल्पाची प्रभावी अंमलबजावणी करा,” असे स्पष्ट निर्देश राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिले. आशियाई विकास बँक अर्थसहाय्यित महाराष्ट्र ॲग्रीबिझनेस नेटवर्क (मॅग्नेट) प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
या बैठकीला केंद्रीय कृषी मंत्रालयाचे विपणन व तपासणी संचालनालयाचे विपणन अधिकारी व्ही.एस. यादव, कृषी पणन संचालक विकास रसाळ, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम, सहव्यवस्थापक विनायक कोकरे, नाबार्डचे उपमहाप्रबंधक हेमंत कुंभारे आदी मान्यवर उपस्थित होते.
रावल यांनी सांगितले की, डाळींब, केळी, संत्रा, पेरु, चिकू, आंबा, द्राक्ष, पपई, हळद, आले, अंजीर, टोमॅटो आदी फळभाजी पिकांच्या मूल्यसाखळीत खाजगी गुंतवणूक आकर्षित करून शेतकऱ्यांना थेट फायदा मिळवून द्यावा.
काढणीनंतरची नासाडी टाळणे, शेतमाल अधिक काळ टिकवणे, डिजिटल शेती सल्ला, ड्रोन फवारणी, सौर शीतगृह, रिफर कंटेनर, बायोमास आधारित तंत्रज्ञान या उपाययोजनांतून शेती व्यवसायाला नवा वेग मिळेल, असेही त्यांनी नमूद केले.
बैठकीत विनायक कोकरे यांनी आशियाई विकास बँक अर्थसहाय्यित मॅग्नेट प्रकल्प – टप्पा १ चा आढावा आणि टप्पा २ चे नियोजन याबाबत सविस्तर माहिती दिली.