Mosambi Rate : मोसंबीचा भाव घसरला; या राज्यातून आवक वाढल्याने शेतकरी चिंतेत

परराज्यातील मोसंबीची मागणी वाढल्याने जालन्याच्या मोसंबीला भावात मोठा फटका सद्यस्थितीला 18 हजार रुपये टन असा भाव मिळत आहे. तर तीन आठवड्यापूर्वी मोसंबीचे दर 22 ते 25 हजार रुपये प्रति टन होते. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. 
मोसंबीचे आगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जालन्यात मोसंबीचे दर हे सहा ते सात हजार रुपयांनी घसरले. परिणामी मोसंबी उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडले आहे. गेल्या 20 दिवसांपूर्वी जालना येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील मोसंबीच्या मार्केटमध्ये 22 ते 25 हजार रुपये प्रति टन भाव होता. मात्र आंध्र प्रदेशातील मोसंबीची आवक वाढल्याने जालन्याच्या मोसंबीला मोठा फटका बसला. भाव 14 हजार रुपयांपासून तर 18 हजार रुपये टन पर्यंत खाली आले.
मागील काही दिवसापूर्वी उत्तर भारतातील थंडीमुळे मोसंबीचे भाव गडगडल्यामुळे जालन्याचं मोसंबी मार्केट बंद ठेवण्याची वेळ आली होती.
येथील मोसंबीला मोठी मागणी असते आणि ही मोसंबी दिल्ली जयपुर, कोलकत्ता आणि उत्तर भारतातल्या विविध शहरात पाठवली जाते. भाव कमी झाल्यामुळे 1 टन मागे सहा ते सात हजार रुपयांचा तोटा मोसंबी उत्पादक शेतकर्यांना सहन करावा लागत आहे. एकीकडे पाण्याअभावी मोसंबीच्या बागा वाचवणं आता शेतकर्यांना कठीण झाले तर दुसरीकडे काटकसरीने पाण्याचा नियोजन करून काढलेल्या मोसंबी ज्यावेळी विक्रीसाठी येत आहे तेव्हा हा तोटा सहन करावा लागत आहे. त्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला.

