हंगामाच्या अंतिम टप्प्यात देखील सोयाबीन दर स्थिर
सध्या सर्वच कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये (Kharif Season) खरीप हंगामातील सोयाबीन तर रब्बी हंगामातील (Chickpea Crop) हरभऱ्याची आवक सुरु आहे. रब्बी हंगामात हरभऱ्याचा पेरा विक्रमी क्षेत्रावर झाला होता. त्यामुळे (Arrival) आवक कायम वाढणार असल्याचा अंदाज आहे. तर दुसरीकडे सोयाबीनचा हंगाम हा अंतिम टप्प्य़ात असून आता दरवाढीची आशा मावळत असल्याचे चित्र वाढत असलेल्या आवकवरुन निर्माण झाले आहे. लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुरीला हमीभावापेक्षा अधिकचा दर असूनही शेतकरी आता तूर साठवणूकीवर भर देत आहेत. तुरीला खरेदी केंद्रावर 6 हजार 300 चा दर आहे खुल्या बाजारपेठेत 6 हजार 600 पर्यंत दर गेला आहे. त्यामुळे खरेदी केंद्रे ही नावालाच आहेत. शिवाय हरभरा खरेदी केंद्रावर बाजारभावापेक्षा अधिकचा दर असूनही येथील किचकट प्रक्रियेमुळे शेतकरी पाठ फिरवत आहेत.
सोयाबीनचे दर स्थिरच, हरभऱ्यात वाढ
गेल्या 15 दिवसाच्या काळात सोयाबीनच्या दरात केवळ 50 रुपयांची वाढ झाली आहे. 7 हजार 250 रुपयांवर असलेले सोयाबीन आता 7 हजार 300 वर स्थिरावले आहे. हंगामाचा अंतिम टप्पा सुरु असून यापेक्षा अधिक घसरण होण्यापूर्वी शेतकरी आता विक्रीवर भर देत आहे. तर दुसरीकडे उन्हाळी सोयाबीनची आवकही काही दिवसांनी सुरु होईल. याचा परिणाम दरावर झाल्यावर अधिकचे नुकसान टाळण्यासाठी शेतकरी सोयाबीन विक्री करीत आहेत. त्यामुळे लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दिवसाकाठी 22 हजार पोत्यांची आवक होत आहे. असे असताना सोमवारी 7 हजार 300 दर होता.
हरभरा दरात वाढ पण खरेदी केंद्रापेक्षा कमीच दर
हंगामाच्या सुरवातीपासून खुल्या बाजारपेठेत हरभऱ्याची आवक ही वाढलेली आहे. सोमवारीही लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सर्वाधिक आवक ही हरभऱ्याची होती. विशेष म्हणजे खरेदी केंद्रापेक्षा दर कमी असताना ही अवस्था आहे. आगामी काळात आवक वाढून अणखी दर घटण्यापेक्षा हरभरा विक्रीवर भर दिला जात आहे. खरेदी केंद्रावर चांगल्या प्रतीचाच माल घेतला जात आहे. मग उर्वरित हरभऱ्याचे करायचे काय म्हणून शेतकरी खुल्या बाजारातच विक्रीला पसंती देत आहे. दिवसाला 30 हजार पोत्यांची आवक सुरु आहे.
शेतकरी शेतीकामात व्यस्त
वाढते ऊन आणि सध्या रब्बी हंगामातील कामे यामुळे शेतीमालाची आवक ही घटलेली आहे. तर बाजारपेठेतील उलाढालही ठप्प आहे. सोयाबीनच्या दरावरच येथील मार्केट अवलंबून असून गेल्या महिन्याभरापासून सोयाबीनचे दर हे स्थिरच आहेत.