टोमॅटोचा भाव गगनाला भिडला, CCTV ची नजर चुकवत चोरट्यांनी शेतातून २५ कॅरेट टॉमॅटो घेऊन लंपास
 
तुम्ही सोनं, पैसा, हिरे या गोष्टींची चोरी ऐकली असेल अन् पाहिलीही असेल पण तुम्ही कधी टोमॅटोची चोरी ऐकलीय का? कोल्हापूरातली हेरवाड येथे अशोक मस्के यांच्या शेतात चक्क टोमॅटोची चोरी झालीय. शेतात CCTV ची नजर चुकवत मस्केंच्या वीस गुंठे शेतातील 25 कॅरेट टोमॅटो चोरट्यांनी तोडून नेले. काळकुट्ट अंधार अन् धोधो पावसाचा चोरांनी फायदा घेत   सोन्यासारखा भाव असणारा टोमॅटो लंपास केला.
मिळालेल्या माहितीनुसार, शिरोळ तालुक्यातील हेरवाड गावचे शेतकरी अशोक मस्के या शेतकऱ्यांच्या रानातील टोमॅटो चोरीला गेला आहे. म्हस्के हे दरवर्षी भाजीपाल्याची शेती करतात. यंदा २५ गुंठ्यामध्ये त्यांनी टोमॅटोची लागवड केली. ते मागच्या दोन दिवसांपूर्वी शेतात येत पिकाची पाहणी करून टोमॅटो तोडण्याच्या नियोजनात होते परंतु शेतात आल्यानंतर टोमॅटोच नसल्याने त्यांना धक्का बसला.
चोरट्यांनी थेट शेतात जात कच्चे पक्के असलेले टोमॅटो चोरून नेले. अंदाजे २० ते ३० क्रेट टोमॅटोची चोरी चोरीला गेल्याची माहिती त्यांनी दिली. यामध्ये सुमारे ५० ते ६० हजार रुपयांचे म्हस्के यांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले. अशोक मस्के यांनी संपूर्ण शेती परिसरात सीसीटीव्ही लावल्याचीही चर्चा आहे.
मात्र मुसळधार पाऊस पडत असल्याने सीसीटीव्हीची नजर चुकवत रात्रीच्या अंधारात या चोरट्यानी चक्क टोमॅटोवर डल्ला मारला. दरम्यान याबाबत पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली आहे.
जिल्ह्यात १५ दिवसात दुसरी घटना
दरम्यान मागच्या काही दिवसांपूर्वी टोमॅटोला आलेले दर पाहून एका समाजकंटकाने शेतकऱ्याच्या शेतातील टॉमेटो उपटून टाकल्याने दहा ते बारा लाखाचे नुकसान केले होते. कोल्हापुरातील सांगवडेवाडी येथील माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना घडली होती. यानंतर ही दुसरी घटना घडली आहे.