तुरीमुळे सामान्यांच्या खिशाला कात्री; तुरीच्या दारात वाढ
 
अमरावती :-पेरणीच्या तोंडावर तुरीच्या दरात रोज वाढ होत आहे. शुक्रवारी येथील बाजार समितीमध्ये ४११० क्विंटलची आवक झाली व उच्चांकी १०,४५१ रुपये क्विंटल रुपयांचा भाव मिळाला आहे. देशांतर्गत तुरीचे उत्पादन घटले आहे व यंदाची तूर फेब्रुवारी २०२४ नंतर बाजारात येणार आहे. त्याला आठ महिन्यांचा अवधी असल्याने तुरीची मागणी अन् भावही वाढले आहेत. त्यामुळे तुरदाळीच्या दरातही वाढ झालेली आहे.
जिल्ह्यात मागच्या हंगामात तुरीचे १.११ लाख हेक्टर क्षेत्र होते. यामध्ये अतिवृष्टी व सततच्या पावसाने 'मर' रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने किमान ३० ते ४० हजार हेक्टरमध्ये मोठे नुकसान झालेले आहे. याशिवाय कडाक्याची थंडीमुळे दवाळ गेल्यानेही काही प्रमाणात नुकसान झाल्याने सरासरी उत्पादनात कमी आलेली आहे. जिल्ह्यातच नव्हे तर देशातंर्गत तूर पिकाची अशीच स्थिती असल्याने तुरीची मागणी वाढली व दरातही सातत्याने वाढ होत आहे.
मागच्या हंगामात तुरीला ६,६०० रुपये प्रति क्विंटल असा हमीभाव मिळालेला आहे. प्रत्यक्षात हंगामात खाजगी बाजारात तुरीला आठ हजारापर्यंत भाव मिळत असल्याने तुरीचे खरेदी केंद्र सुरु झाले नाही . कृषी विभागाच्या माहिती नुसार यावेळी तुरीची उत्पादकता हेक्टरी ४०९ किलो राहिली आहे. उत्पादनात कमी आल्याने दरवाढ होत आहे.