इंडिगोच्या गोंधळामुळे शेतकऱ्यांचे 5 दिवसात 10 कोटी पाण्यात, फुल उत्पादक मोठ्या आर्थिक संकटात
-हवाई वाहतूक ठप्प गुलाब उत्पादक विशेषतः मावळ शेतकरी आर्थिक अडचणीत
एपीएमसी न्यूज़ नेटवर्क : देशातील प्रमुख विमानसेवा इंडिगो एअरलाईन्समधील कारभारातील गोंधळाचा थेट फटका आता फुल उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. गेल्या पाच दिवसांत देशभरातील फुल उत्पादकांचे तब्बल १० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेषतः मावळ तालुक्यातील सुप्रसिद्ध गुलाब उत्पादक शेतकरी सर्वाधिक अडचणीत सापडले असून सुमारे २ कोटी रुपयांचे नुकसान या भागात झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
हवाई वाहतूक ठप्प लाखो फुले अडकली
देशात रोज जवळपास ४० लाख गुलाब फुलांची वाहतूक होते. यापैकी २५ टक्के म्हणजे सुमारे १० लाख फुलांची वाहतूक हवाई मार्गे केली जाते. मात्र इंडिगोमध्ये सुरु असलेल्या गोंधळ, विलंब आणि फ्लाइट व्यवस्थापनातील त्रुटींमुळे ही लाखो फुले विविध विमानतळांवर चढणीची वाट बघत पडून राहिली.
नाशवंत स्वरूपामुळे वेळेवर बाजारपेठेत न पोहोचल्याने ही फुले खराब झाली आणि शेतकऱ्यांच्या कमाईचे रूपांतर काही क्षणातच तोट्यात झाले.
एका दिवसात २ कोटींचे नुकसान
सध्याचा गुलाबाचा सरासरी दर प्रति फूल २० रुपये एवढा आहे. लाखो फुले खराब झाल्याने केवळ एका दिवसातच तब्बल २ कोटी रुपयांचा फटका फुल उत्पादकांना बसला. गेल्या पाच दिवसांचा हिशोब केला असता ही रक्कम थेट १० कोटींपर्यंत पोहोचली आहे.
“नुकसान कोण भरून देणार?” — शेतकऱ्यांचा संतप्त सवाल
मावळसह देशभरातील फुल उत्पादक शेतकऱ्यांनी सरकार आणि इंडिगो एअरलाईन्सविरोधात संताप व्यक्त केला आहे.फुले दीर्घकाळ साठवता येत नाहीत, त्यांची वाहतूक वेळेवर न झाल्यास थेट नुकसान होते, याकडे लक्ष वेधत —“आमच्या कोट्यवधींच्या फुलांची हानी झाली, आता ह्या मोठ्या नुकसानीची जबाबदारी कोण घेणार?” असा मांजरदृष्टी सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित होत आहे.
शेतकरी संघटनांनी तत्काळ नुकसान भरपाई, हवाई वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी आवश्यक पावले उचलण्याची मागणी केली आहे.