Agricultural Exhibition : पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन कोल्हापुरात, उद्यापासून होणार सुरुवात
Agricultural Exhibition : पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन कोल्हापुरात, उद्यापासून होणार सुरुवात
कोल्हापूर : शेतकऱ्यांना नवनवीन शेतीविषयक तंत्रज्ञानाची माहिती एकाच छताखाली मिळावी, या उद्देशाने शुक्रवार (ता. २२) पासून सतेज कृषी व पशुपक्षी प्रदर्शनाला प्रारंभ होणार आहे. डी. वाय. पाटील ग्रुप, महाराष्ट्र शासन कृषी विभाग, 'आत्मा' आणि कृषी विज्ञान केंद्राच्या संयुक्त विद्यमाने तपोवन मैदानावर हे प्रदर्शन होणार आहे.या प्रदर्शनात अडीचशेहून अधिक स्टॉल, दोनशेपेक्षा अधिक पशुपक्षी यांचा समावेश असल्याची माहिती विधान परिषदेचे काँग्रेस पक्षाचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी दिली. चार दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवारी (ता. २२) सायंकाळी चारला होणार आहे.
देश-विदेशातील विविध नामांकित कंपन्यांचा प्रदर्शनात सहभाग आहे. पशु-पक्षी दालन, तज्ज्ञांचे मार्गदर्शन, विविध कंपन्यांची उत्पादने व शेतकऱ्यांसाठी नवनवीन आधुनिक तंत्रज्ञान, मशिनरीची माहिती एकाच छताखाली उपलब्ध होणार आहे.
तांदूळ महोत्सव, धान्य महोत्सव, २५० पेक्षा अधिक कृषी कंपन्यांचा सहभाग, २०० पेक्षा अधिक पशुपक्ष्यांचा सहभाग, शेती विषयकतज्ज्ञांचे मार्गदर्शन व चर्चासत्र, विविध शेती अवजारे, बी-बियाणे खते आदींची माहिती, फुलांचे प्रदर्शन व विक्री (पुष्पप्रदर्शन) विविध सांस्कृतिक कार्यक्रम व बचत गटांचे मोफत स्टॉल, लहान मुलांसाठी अम्युझमेंट पार्क ही प्रदर्शनाची वैशिष्ट्ये आहेत.
पीक स्पर्धा, पुष्प स्पर्धा, खाद्य महोत्सव होणार असून, शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली जाणार आहे. तीन दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रमही होणार असून, शेतकऱ्यांना शेतीभूषण पुरस्कार, आदर्श शेतकरी पुरस्कार आणि कृषी विभागाच्या वतीनेही पुरस्कार व बक्षिसे दिली जाणार आहेत. रत्नागिरी २४, भोगावती, इंद्रायणी तांदूळ शेतकऱ्यांकडून थेट विक्रीसाठी उपलब्ध असेल.