केळी उत्पादकांसाठी दिवाळीपूर्वी खुशखबर !फळपिक विम्याची संपूर्ण भरपाई मिळण्याची शक्यता — कृषी विभागाचा दावा

केळी उत्पादकांसाठी दिवाळीपूर्वी खुशखबर !फळपिक विम्याची संपूर्ण भरपाई मिळण्याची शक्यता — कृषी विभागाचा दावा
-केळी शेतकऱ्यांना अखेर दिलासा मिळणार!
आक्रोश मोर्चानंतर शासनाची दखल – विमा भरपाई लवकरच खात्यात
-हवामानामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी दिलासा!
भारतीय कृषी विमा कंपनीकडून पे-आऊट प्रक्रिया सुरु
जळगाव :
जिल्ह्यातील हजारो केळी उत्पादक शेतकऱ्यांना अखेर दिलासा मिळण्याची चिन्हे दिसत आहेत. दिवाळीपूर्वी फळपिक विम्याची संपूर्ण भरपाई मिळेल, असा दावा कृषी विभागाने केला आहे. पुर्नरचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजनेअंतर्गत नुकसानभरपाई मिळण्यात झालेल्या विलंबामुळे नाराज शेतकऱ्यांना आता दिवाळीपूर्वी दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
फळपिक विमा थकबाकीचा प्रश्न सुटणार
सन २०२४-२५ करिता पुर्नरचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजना (आंबिया बहार) अंतर्गत मोसंबी, डाळिंब, केळी, आंबा आणि पपई या फळपिकांचा समावेश करण्यात आला होता. ही योजना भारतीय कृषी विमा कंपनीमार्फत राबविण्यात आली. मात्र हवामान बदलामुळे नुकसान झालेल्या पिकांच्या भरपाईची रक्कम कंपनीकडून अद्याप वितरीत झाली नव्हती.
या पार्श्वभूमीवर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडून सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवण्यात आला आहे. कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दिवाळीपूर्वी पात्र सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात भरपाईची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
मंत्र्यांचे विशेष लक्ष – सातत्याने बैठका
या संपूर्ण प्रकरणाकडे जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी विशेष लक्ष दिले आहे. तसेच केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, मंत्री गिरीश महाजन, संजय सावकारे, खासदार स्मिता वाघ आणि जिल्ह्यातील सर्व आमदारांनी जिल्हाधिकारी व कृषी विभागासोबत नियमित बैठका घेत विमा कंपनीला तत्काळ भरपाई देण्याचे निर्देश दिले होते.
भारतीय कृषी विमा कंपनीकडून नुकतीच हेक्टरी पे-आऊट रकमेची माहिती प्राप्त झाली असून, ती अपूर्ण असल्याने उर्वरित आकडेवारी मिळविण्यासाठी विभाग सतत संपर्कात आहे.
कंपनीकडून प्रक्रिया प्रगतीपथावर
१२ ऑक्टोबर रोजी प्राप्त ई-मेलनुसार, सन २०२४-२५ मधील आंबिया बहार अंतर्गत उर्वरित महसूल मंडळांचे दावे निकाली काढण्याची प्रक्रिया प्रगतीपथावर असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. हवामान डेटा, AWS आणि BWS प्रणालीतील तांत्रिक पडताळणी सुरू असून पात्र दावे निकाली काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. सर्व पात्र शेतकऱ्यांचे दावे दिवाळीपूर्वी निकाली काढण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
शेतकऱ्यांच्या आक्रोश मोर्चाला यश
फळपिक विमा रकमेतील विलंबामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांनी नुकताच प्रहार जनशक्ती पक्षाचे बच्चू कडू आणि शिवसेनेचे (उद्धव ठाकरे गटाचे) माजी खासदार उन्मेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली जळगावमध्ये आक्रोश मोर्चा काढला होता. या आंदोलनानंतर राज्य सरकारच्या पातळीवर हालचाल सुरू झाली.
त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेते आमदार एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देऊन केळी उत्पादकांना विमा भरपाई मिळवून देण्याची मागणी केली होती.
पार्श्वभूमी
दरवर्षी ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात केळी उत्पादकांना विम्याची रक्कम मिळत असे. मात्र, यंदा संबंधित विमा कंपनीने मुदत संपल्यानंतरही महसूल मंडळांची पात्र यादी जाहीर न केल्याने शेतकरी संतप्त झाले होते. आता शासन, कृषी विभाग आणि लोकप्रतिनिधींच्या पुढाकारानंतर दिवाळीपूर्वी विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.