पालघर-दापचरीत होणार महामुंबई आंतरराष्ट्रीय कृषी बाजारपेठ - CM फडणवीस यांची घोषणा

मुंबई, एपीएमसी न्यूज़ नेटवर्क :राज्यात ‘रुंगीस’ आंतरराष्ट्रीय बाजारपेठेच्या धर्तीवर ‘महामुंबई आंतरराष्ट्रीय कृषी बाजारपेठ’ उभारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून, यासाठी पालघर जिल्ह्यातील दापचरी येथील जागेची पाहणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.
विधानभवनात झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी पणन मंत्री जयकुमार रावल, मुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, सचिव श्रीकर परदेशी, सहकार व पणन विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे, कृषी विभागाचे सचिव विकास चंद्र रस्तोगी, पालघर जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, मुंबई एपीएमसी सचिव डॉ. पी.एल. खंडागळे   ,पुणे एपीएमसी सचिव राजाराम धोंडकर यांच्यासह विविध वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “राज्यातील ३०५ कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे सक्षमीकरण करण्यासाठी सचिवांच्या राज्यस्तरीय केडरची निर्मिती केली जाईल. जागा नसलेल्या बाजार समित्यांसाठी जिल्हा सहनिबंधकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर करावा.”
यावेळी पणन मंत्री जयकुमार रावल यांनी स्पष्ट केले की, ‘रुंगीस मार्केट’सारखी जागतिक बाजारपेठ उभारण्याचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी त्यात रस दाखवला आहे. देश-विदेशात शेतीमालाचा थेट पुरवठा सुलभ व्हावा, हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे.
तसेच या बैठकीत ठाणे जिल्ह्यातील बापगाव येथे मल्टी मॉडेल हब, नागपूरच्या काळडोंगरी येथे कृषी सुविधांचा प्रकल्प, ‘एक तालुका – एक बाजार समिती’, आणि संत्रा प्रक्रिया केंद्र उभारण्याचेही नियोजन करण्यात आले.
या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचा विकास झाल्यास महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना जागतिक बाजारपेठांपर्यंत थेट पोहोच मिळणार असून त्यांचे उत्पन्नही मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे.
1. दापचरीत उभा राहणार शेतकऱ्यांचा जागतिक बाजार!
2. महाराष्ट्रात पहिली ‘रुंगीस’च्या धर्तीवरची इंटरनॅशनल मार्केट यार्ड!
3. शेतीमालाच्या थेट निर्यातीसाठी भक्कम पायाभूत सुविधा निर्माण होणार
4. मुख्यमंत्री फडणवीस आणि मंत्री रावल यांच्या नेतृत्वात क्रांतिकारी निर्णय