गावरान सीताफळ खातोय भाव, अवकाळी पाऊस व अळीच्या प्रादुर्भावाने उत्पादन घटले

नवी मुंबई : मुंबई एपीएमसी होलसेल फळ बाजारात गोड चवीसाठी ओळखले जाणारे गावरान सीताफळ ग्राहकांच्या पसंतीस उतरले असून त्याला चांगला भाव मिळतोय. मात्र अवकाळी पाऊस आणि अळीच्या प्रादुर्भावामुळे यंदा उत्पादनात तब्बल ३० ते ४० टक्क्यांची घट झाली आहे. त्यामुळे शेतकरी आणि व्यापाऱ्यांचे दोघांचेही आर्थिक गणित बिघडले आहे.
सप्टेंबरपासून सीताफळांचा हंगाम सुरू होतो. पण मे महिन्यातील पावसामुळे झाडांची फुलगळती झाली. त्यातच गोल्डन सीताफळांवर अळीचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकऱ्यांना दुहेरी फटका बसला.
सध्या एपीएमसीत दररोज २,५०० ते ३,००० कॅरेट सीताफळांची आवक होत असून बुधवारी (१० सप्टेंबर) २०८० क्विंटल आवक झाली. मात्र त्यातील मोठा माल खराब झाल्याने शेतकरी व व्यापाऱ्यांना तोटा सहन करावा लागला. घाऊक बाजारात गावरान सीताफळ ३० ते १२० रुपये किलोदराने, तर गोल्डन सीताफळ ५० ते २०० रुपये किलोदराने विक्रीस जात आहे.
महाराष्ट्रातील सोलापूर, बीड, अहमदनगर, जालना, औरंगाबाद व नाशिक जिल्ह्यांतून मुख्यतः सीताफळाची आवक होते. गावरान सीताफळांचा हंगाम नोव्हेंबरपर्यंत चालेल, तर गोल्डन सीताफळांचा हंगाम डिसेंबर-जानेवारीत सुरू होईल. पण यंदा एक महिना अगोदरच गोल्डन सीताफळ बाजारात आले असून अळीच्या प्रादुर्भावामुळे त्याचा दर्जा खालावल्याचे व्यापारी सांगत आहेत.
व्यापाऱ्यांचे म्हणणे
“गावरान सीताफळांना ग्राहकांचा चांगला प्रतिसाद आहे, पण अळ्यांच्या प्रादुर्भावामुळे माल मोठ्या प्रमाणात खराब होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तो फेकून द्यावा लागतोय. हीच परिस्थिती कायम राहिल्यास शेतकरी आणि व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान अटळ आहे.” — संजय काळे, व्यापारी, एपीएमसी फळ बाजार